सेट टॉप बॉक्स न बसवणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे २५ हजार दूरचित्रवाणीचे प्रक्षेपण आज थांबवण्यात आले. महसूल विभागाच्या या कारवाईने अनेक तालुक्यांतील ग्राहकांना त्याचा फटका बसला असला तरीही भविष्यात करमणूक कराच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर महसूल मिळेल, असा दावा केला जात आहे.
टीव्ही डिजिटायजेशन टप्प – ३ अंतर्गत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य शासनाने सेट टॉप बॉक्स न बसवणाऱ्या दूरचित्रवाणीचे प्रक्षेपण थांबवण्याचा निर्णय घेतला. सेट टॉप बॉक्स बसवण्याला मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य सरकारने केलेले प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर शुक्रवारपासून जिल्हा प्रशासनाने आपापल्या भागात कारवाई सुरू केली आहे. नांदेड जिल्ह्यात नांदेड, वाजेगाव, धनेगाव, बळीरामपूर, वाघाळा या भागात डिजिटायजेशन झाले. पण अनेक भागात ही सेवाच उपलब्ध करून देण्यात आली नाही. नांदेड जिल्ह्यात ७२ हजार केबल ग्राहक व ७१ हजार डीटीएच पाहणाऱ्या ग्राहकांची नोंद आहे. १लक्ष ४३ हजार ग्राहक जिल्ह्यात आहेत. वारंवार सूचना करूनही सेट टॉप बॉक्स बसवण्यासंदर्भात चालढकल करणाऱ्या हदगाव, धर्माबाद, उमरी, भोकर व किनवट या पाच तालुक्यांतील सेवा बंद करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या सूचनेनुसार आज २५ हजारापेक्षा अधिक ग्राहकांचे प्रक्षेपण थांबवण्यात आले आहे. महसूल विभागाकडे प्रत्यक्षात हा आकडा १२ हजार आहे. जिल्ह्यात ग्राहकांची संख्या आणि महसूल विभागाकडे असलेली नोंद यातच मोठी तफावत आहे.

Story img Loader