औरंगाबाद : एमआयडीसी वाळूज परिसरात एका २८ वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. बी सेक्टरमधील स्टरलाईट कंपनीजवळ ही घटना घडली. धम्मपाल शांतावन साबळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो मूळचा गंगापूर तालुक्यातील माळुंज-खुर्द येथील रहिवासी आहे. हल्ली त्याचा मुक्काम वाळूज एमआयडीसी परिसरात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
धम्मपाल साबळे हा एमआयडीसी वाळूज परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. सोमवारी स्टरलाईट कंपनी परिसरात एक युवक रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गायकवाड, उपनिरीक्षक राहुल रोडे यांच्यासह डीबी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी सापडलेल्या आधारकार्डवरून मृताचे नाव धम्मपाल साबळे असल्याचे स्पष्ट झाले, असे पोलिसांनी सांगितले.