जालना शहरासह जिल्ह्य़ात गुरुवारी व शुक्रवारी जोरदार पाऊस बरसला. गुरुवारी दुपारी तीननंतर सुरू झालेला पाऊस गेल्या अनेक वर्षांत प्रथमच सलग २४ तासांनंतरही सुरू होता. शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात सरासरी ७५ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे या वर्षी झालेला आजपर्यंतचा एकूण पाऊस ४१८ मिमी झाला. जालना-औरंगाबाद रस्त्यावर अनेक ठिकाणी बाजूंच्या शेतांमधून पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
शुक्रवारी जिल्ह्य़ातील आठही तालुक्यांत जोरदार वृष्टी झाली. भोकरदनमध्ये सर्वाधिक ९३ मिमी, तर अन्य तालुक्यांत झालेला पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे : जालना ९१, बदनापूर ७०, जाफराबाद ६०, परतूर ८२, मंठा ७६, अंबड ६९ व घनसावंगी ५१. जोरदार पावसामुळे जालना शहरास पाणीपुरवठय़ाचा एक स्रोत असलेल्या घाणेवाडी तलावाची पातळी जवळपास ५ फुटांनी वाढली. जालना शहरातील सीना नदीचे पाणी बसस्थानकाजवळ काही काळ पुलावरून ओसंडून वाहत होते. त्यामुळे वाहतूक खोळंबली. कुंडलिका नदीही दुथडी भरून वाहत होती. भाग्यनगर, योगेश्वरीनगरसह शहराचा काही सखल भाग जलमय झाला होता. मोती व अमृतेश्वर तलावांत एकाच रात्रीत मोठय़ा प्रमाणावर जलसाठा झाला.
औरंगाबाद जिल्ह्य़ात करमाडजवळील पाझर तलाव फुटल्यामुळे जालना जिल्ह्य़ाच्या बदनापूर तालुक्यातील भाकरवाडी गावात पाणी शिरले. तहसीलदार व पुरवठा अधिकाऱ्यांनी या भागास भेट देऊन पाहणी केली. प्रकल्प ओसंडून वाहत असल्यामुळे बदनापूरच्या ढासला व मालेवाडी या गावांत पाणी शिरले. मालेवाडी गावाचा संपर्कही तुटला. घनसावंगी तालुक्यातील मंगरुळ जवळचा प्रकल्प ओसंडून वाहत असल्यामुळे तेथे सतर्कतेचा इशारा देण्यात आला. भोकरदनच्या निधोरा गावाजवळील नदीस मोठा पूर आला. तेथील स्थितीची उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी पाहणी केली.

Story img Loader