दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांसाठी ६ महिन्यात तब्बल ३१ कोटींचा खर्च झाला. यात सर्वाधिक खर्च टँकरवर झाला. उर्वरित खर्च विहीर, बोअर अधिग्रहण व तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांवर झाला. उपाययोजनांसाठी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली असली, तरी जनतेची मात्र कायमस्वरूपी उपाययोजनांची प्रतीक्षा कायमच आहे.
जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. तब्बल ५९६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. नगरपालिका व नगरपंचायत कार्यक्षेत्रात क्वचितच टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. ग्रामीण भागात झालेल्या पाणीपुरवठय़ावर ६ महिन्यात २१ कोटी खर्च झाले. राज्यात सर्वाधिक टँकर बीड जिल्ह्यात सुरू होते. टँकरच्या माध्यमातून ग्रामीण जनतेची तहान भागवली जात असली, तरी ठिकठिकाणी विहीर व बोअर अधिग्रहित करण्यात आले. या साठी साडेचार कोटी खर्च झाला. प्रत्येक महसूल मंडळांतर्गत टंचाई उपाययोजना करण्यात आल्या. तात्पुरत्या पाणीयोजनांवर साडेपाच कोटी खर्च झाला. लोकांची तहान भागवण्याच्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनांवर प्रथमच मोठय़ा प्रमाणात खर्च झाला. यापूर्वी पाणीपुरवठय़ावर झाला नाही, एवढा खर्च या वेळी झाला.
ग्रामीण भागात जुने आड, विहिरींमधील गाळही काढण्यात आला. पाणी पुरवठय़ापाठोपाठ आता जनावरांच्या छावण्यांवर दररोज साडेतीन लाख रुपये खर्च होत आहे. छोटय़ा जनावरांसाठी ३५, तर मोठय़ांसाठी ७० रुपये प्रतिदिन खर्च होत आहे. यावरून दुष्काळी उपाययोजनांसाठी मोठय़ा प्रमाणात निधी खर्च होत आहे. परंतु हा खर्च केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवरच झाला आहे. अजूनही कायमस्वरीूपी उपाययोजनांची मागणी केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा