छत्रपती संभाजीनगर: गुप्त दान पेटी उघडून रक्कम न्यासच्या विश्वस्तांना देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी धर्मदाय आयुक्त कार्यालयातील वर्ग-३ च्या निरीक्षकाविरुद्ध कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच घेताना पकडण्यासाठी सोमवारी सायंकाळच्या दरम्यान सापळा लावण्यात आला होता.
दीप दौलतराव बागुल (वय ३९, रा. रामगोपालनगर, छत्रपती संभाजीनगर), असे लाच मागणाऱ्या निरीक्षकाचे नाव आहे. दीप बागुल याने कन्नडमधील कालीमठ न्यासच्या (उपळा) गुप्त दान पेटीतील रक्कम विश्वस्तांना देण्याचा मोबदला म्हणून १० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल करण्यात आली होती. पंचांसमक्ष सोमवारी दीप बागुल लाच घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोरखनाथ गांगुर्डे यांनी लावलेल्या सापळ्यात अडकला.