छत्रपती संभाजीनगर : धाराशिव जिल्ह्यातील भूम पोलीस ठाण्याचे हवालदार व गृहरक्षक दलाचा जवानाविरुद्ध रविवारी ऊसतोड महिलेला मारहाण करून तिच्यावर बलात्काराचा व धमकावत १० हजार रुपये फोन-पे वरून घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडू सुदान भुरके व सागर चंद्रकांत माने, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दगडू भुरके हे भूम ठाण्यातच हवालदार आहेत. तर सागर माने हा जीपचालक म्हणूनही काम करतो.

याप्रकरणी एका महिलेने तक्रार दिली असून त्यानुसार २ फेब्रुवारी रोजीची घटना आहे. तक्रारदार महिला ही शुक्रवारी भूम बसस्थानकावर दीरासोबत बार्शीला जाण्यासाठी आली होती. बसची वाट पाहत असताना पोलीस हवालदार दगडू भुरके याने कुठून आलात व कशासाठी थांबलात, असे विचारत तुम्ही चोर दिसताय, असा संशय घेतला. तसेच पोलीस ठाण्यात नेतो म्हणून भूम बाजार तळाच्या ठिकाणी नेले. तेथे मारहाण करून उठाबशा काढण्यास भाग पाडले व सोडून देण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली. ऊसतोड मजूर असल्याने एवढी रक्कम देऊ शकत नसल्याचे सांगूनही मुकादमाकडून फोन-पे-वर रक्कम मागून घेतली. त्यानंतर आष्टामोड रस्त्यावर पुन्हा मॅडमने बोलावल्याची बतावणी करून दीराला सोडून एकटीला दुचाकीवर बसवून एका शेतात नेत अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader