छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणावरील डावा कालव्याच्या दुरुस्तीसाठी एक हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. २०८ किलोमीटरच्या या कालव्याच्या दुरुस्तीमुळे पाणी पोहचण्याचा कालावधी ३५ दिवसांवरून २८ दिवसांपर्यंत कमी होईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. या दुरुस्तीसाठी ३५०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम लागणार होती. मात्र, त्यातील पहिल्या टप्प्यातील निधी मंजूर करण्यासाठी प्राधान्यक्रम बदलण्याची विनंती करण्यात आली आहे. येत्या महिनाभरात यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक तिरमनवार यांनी सांगितले.
पैठणच्या डाव्या कालव्यातून ३ हजार ६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होणे अपेक्षित असते. मात्र, सध्या पाण्याचा वेग २ हजार १०० क्युसेक वेगाने चालवावा लागतो. तो वाढविण्यासाठी डाव्या कालव्याची दुरुस्ती आवश्यक असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात होता. मात्र, दुरुस्तीचा हा प्रस्ताव दुसऱ्या टप्प्यात हाती घेतला जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, जल सुधार क्षेत्र कार्यक्रमात या कामाची प्राधान्यक्रमता बदलावी, अशी मागणी करण्यात आली होती. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राधान्यक्रम बदलून निधी देण्याच्या प्रस्तावास तत्वत: मान्यता दिली आहे. पुढील आठवड्यात या विषयीचा निर्णय होईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. सिंचनविषयक पंधरवाड्यातील कृती आराखड्यात जलसंपदा विभागाच्या जमिनीचे सातबारा अद्ययावत करण्यापासून पाण्याच्या थकबाकी वसूल करण्यापर्यंतचे विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.