राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्यामुळे चौफेर टीका होत असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोमवारच्या सभेवरुन उद्धव ठाकरे गटाचे नेते आंबादास दानवे यांनी व्हिडीओ शेअर करत टीका केली आहे. अंबादस दानवेंनी सत्तार यांच्या सोमवारच्या सभेतील व्हिडीओ शेअर करत सभेला गर्दी नसल्याने खुर्च्या उचलण्याची वेळ आली असा टोला लगावला आहे.
सुप्रिया सुळेंबद्दल कॅमेऱ्यासमोर वादग्रस्त विधान करणाऱ्या सत्तार यांची काल औरंगाबादमधील सिल्लोड येथे सभा होती. सत्तारांच्या मतदारसंघामधील या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेही उपस्थित होते. या सभेला लाखो लोकांची गर्दी असेल असा दावा सत्तार यांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात उलटं चित्र या सभेत दिसून आलं. भाषण सुरु असतानाच रिकाम्या खुर्च्या उचलण्याचं काम सुरु करण्यात आलं. भाषण सुरु असताना मंचावरुन रिकाम्या खुर्च्या दिसू नये म्हणून खुर्च्या उचलून बाजूला ठेवण्यात आल्या.
सभेला अपेक्षित गर्दी न जमल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हाच व्हिडीओ विधान परिषदचे विरोधी पक्षनेते असलेल्या अंबादास दानवेंनी शेअर करत सत्तार यांना टोला लगावला आहे. “मैदान भरले नाही म्हणून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे भाषण चालू असताना खुर्च्या उचलण्याची वेळ काल रात्री आली. लाखोंचा जनसमुदाय येणार असल्याची वल्गना कुठे गेली? लोकांना भाषण आवडलं नसेल कदाचित,” अशा कॅप्शनसहीत दानवेंनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, सभा सुरु असतानाच उपस्थितांपैकी अनेकजण मैदानातून बाहेर पडू लागले तेव्हा मंचावरुन सत्तार यांनी ओरडून सभा संपेपर्यंत कोणीही मैदानाबाहेर पडू नये असं सांगितलं. मात्र त्याचा लोकांना फारसा परिणाम झाला नाही.