छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये दीड महिन्यांच्या बाळासह आई, आजी आणि सात वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. शुक्रवारी हे कुटुंब अमरावतीहून पुण्याच्या दिशेने जात असताना वाळूजपासून तीन किलोमीटर पुढे लिंबेजळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, दहा वर्षांनंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून हे कुटुंब पुण्याला जात होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी अजय देसरकर हे अभियंते अमरावतीहून कुटुंबासह त्यांच्या रेनो क्वीड गाडीने पुण्याला जात होते. यावेळी वाळूजकडून तीन किलोमीटर पुढे गेल्यानंतर विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची गाडी थेट दुभाजकांना ओलांडून देसरकर यांच्या कारला जाऊन धडकली. या अपघातात देसरकर कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी स्कॉर्पिओ चालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. ही गाडी वाळूज येथील एका १९ वर्षीय तरुणांची असून त्याने ही गाडी त्याच्या मित्राला चालवायला दिली होती. यावेळी दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचे हा अपघात घडल्याची माहिती वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांनी दिली आहे. तसेच त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आल्याचही त्यांनी सांगितले.