छत्रपती संभाजीनगर – सर्वसामान्य व्यक्ती, ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाईन होणारी फसवणूक ही सर्वांचीच डोकेदुखी ठरत असून सायबर भामट्यांना पकडून रक्कम हस्तगत करणे पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात आता स्वतंत्र सायबर डेस्क निर्माण करण्याचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिले आहेत. सायबर डेस्कवर काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन दिवसीय प्रशिक्षण पोलिस आयुक्तालयात देण्यात आले असल्याची माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांनी मंगळवारी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही महिन्यापासून सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीच्या प्रकरणात वाढ होत आहे. त्यामध्ये आर्थिक फसवणूक, सोशल मीडिया साईट असलेले फेसबूक आणि इस्टाग्रामवर महिला व तरुणींच्या फोटोत बदल करुन बदनामी करणे, सोशल मीडिया अकाऊंट, बँक अकाऊंट हॅक करणे यांचा समावेश आहे. तसेच मोबाईल चोरट्यांनी देखील उच्छाद मांडला असून दिवसेंदिवस मोबाईल चोरीच्या घटनांत देखील वाढ झाली आहे. सायबर भामट्यांना रोखण्यासाठी तसेच गुन्ह्यांचा जलदगतीने तपास करण्यासाठी शहरातील सर्व पोलिस ठाण्यात स्वतंत्र सायबर डेस्क निर्माण करण्याचे आदेश पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिले आहेत.

गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, गुन्हेशाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एक उपनिरीक्षक आणि दोन पोलिस अंमलदाराची नियुक्ती सायबर डेस्कसाठी करण्यात येणार आहे. सायबर डेस्कसाठी निवड करण्यात आलेल्या उपनिरीक्षक आणि पोलिस अंमलदारांना आर्थिक फसवणूक रोखणे, पोर्टलवरुन होणाऱ्या ऑनलाईन तक्रारींची दखल घेवून कारवाई करणे, सोशल मीडियावरील तक्रारी, मोबाईलचा सीडीआर डाटा तपासणे, सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासणे, ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास काय कारवाई करायची याबाबतचे प्रशिक्षण सायबर तज्ञामार्फत देण्यात येत असल्याचे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष भुजंग यांनी सांगितले.