औरंगाबाद : नगरसेवकपदाची निवडणूक लढवणाऱ्या पत्नीचे प्रचारासाठी घेतलेल्या वाहनावरील चालकाशीच अनैतिक संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर त्याचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेप व विविध कलमांखाली दोन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी मंगळवारी सुनावली. मुकेश सुखबीर लाहोट (रा. हर्षनगर) असे आरोपीचे नाव आहे. महानगरपालिकेच्या २०१५ सालच्या निवडणुकीत भीमनगरमधून एका पक्षाच्या उमेदवार म्हणून मुकेश लाहोटची पत्नी लढत होत्या.
तिच्या प्रचारासाठी लाहोटने अल्ताफ याला सोबत घेतले होते. निवडणुकीदरम्यान, अल्ताफ आणि लाहोटमध्ये वाद झाला होता. त्यामुळे अल्ताफने त्याच्यासोबत प्रचार करणे सोडून दिले होते. अल्ताफचे लाहोटच्या पत्नीसोबत संबंध जुळले होते. हा प्रकार लाहोटला समजला होता. दरम्यान, २१ मार्च २०१६ रोजी रात्री अल्ताफचे अपहरण करत मुकेश लाहोट, संतोष प्रभाकर नरवडे, सनी सतपाल राणा, विराज सुरेंद्र सौदागर, चंद्रकांत राजू शिर्के यांनी खून केला होता. यानंतर लाहोटच्या वाहनातून अल्ताफचा मृतदेह पहूरनजीकच्या वाकोद येथील बंद पडलेल्या ढाब्याच्या सिमेंटच्या हौदात फेकून दिला होता. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास अधिकारी गुन्हे शोखेचे निरीक्षक अविनाश अघाव यांनी दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता बी. आर. लोया यांनी २१ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात मृताचा भाऊ, मामा व इतर साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने मुकेश लाहोट याला दोषी ठरवून जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली. तर इतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी सरकारच्या वतीने अॅड. बी.आर. लोया तर निर्दोष सुटका झालेल्यांच्या वतीने अॅड. राजेश काळे आणि अॅड. प्रकाश उंटवाल यांनी काम पाहिले.