औरंगाबादच्या उद्योगांसाठी अतिरिक्त पाणी कपात करावी लागेल काय, याची चाचपणी केली जाणार असून तत्पूर्वी उद्योजक संघटनांशीही चर्चा केली जाईल, असे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी गुरुवारी सांगितले.
पाणीटंचाई व जलयुक्त शिवार योजनेला गती देण्यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी बठक घेतली. यापूर्वी उद्योगांसाठी १० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. तसेच औद्योगिक पाणीपुरवठय़ाच्या योजनेतूनच ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा होत आहे. औरंगाबाद औद्योगिक वसाहतीत औषधी, बीअर उत्पादक कंपन्यांना तुलनेने अधिक पाणी लागते. जायकवाडीच्या मृतसाठय़ातून सध्या पाणीपुरवठा होत असल्याने त्याचा आढावा घेण्यासाठी आयुक्त दांगट यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पाणीकपातीची गरज आहे का, याची चाचपणी करताना उद्योजक संघटनांशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा करावी, अशी सूचना त्यांनी केली. शहर पाणीपुरवठय़ासाठी जायकवाडीत चर घेण्याची आवश्यकता आहे का, याचा आढावा या वेळी घेण्यात आला. २०१२ मध्ये या उपाययोजनांचा लाभ झाला होता. त्यामुळे अशा उपाययोजना हाती घेण्याबाबतही चर्चा झाल्याचे दांगट म्हणाले.
लातूरच्या पाण्यासाठी तळे
मिरज येथील वारणा नदीच्या बंधाऱ्यात रेल्वेसाठी आरक्षित १६ दशलक्ष घनमीटर पाण्यातून रेल्वेने १५ एप्रिलपर्यंत लातूर येथे पाणी आणले जाणार आहे. त्यासाठी लातूर शहराच्या पाणीपुरवठा योजनेपासून ३ किलोमीटरवर तळे तयार केले जाणार आहे. त्यात मेणकापड अंथरले जाणार आहे. पाणी उचलण्यासाठी वीज उपलब्ध व्हावी, या साठी एक्सप्रेस फिडरची सोय केली जाणार असून त्याचे अंदाजपत्रक गुरुवारी रात्रीपर्यंत येईल. त्यास तातडीने निधी दिला जाणार आहे. एकदा रेल्वेने पाणी दिल्यानंतर दुसरी गाडी लगेच दोन दिवसाने मिळणार आहे. या साठी रेल्वे प्रशासनाने खर्च मागितला नसल्याचे दांगट यांनी सांगितले.
‘जलयुक्तला गती द्या’
जलयुक्त शिवार योजनेसाठी मराठवाडय़ात १ हजार ६८२ गावांची पहिल्या टप्प्यात निवड झाली होती. त्यातील केवळ ३४ गावांचे काम पूर्ण झाले असल्याने योजनेच्या गतीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले. तसेच काही तज्ज्ञांनी जलयुक्तची तांत्रिकता सदोष असल्याचे म्हटल्याने पाणलोटाच्या धर्तीवर जलयुक्तची कामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोणत्याही स्थितीत १५ जूनपर्यंत ही कामे संपवा, अशा सक्त सूचना गुरुवारच्या बठकीत देण्यात आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा