आप्तेष्ट आणि स्नेहीजणांना लग्नाचे निमंत्रण देताना आधारकार्डचे डिझाईन वापरुन बहिणीच्या लग्नाची पत्रिका छापली. यामुळे शहरात या पत्रिकेची जोरदार चर्चा सुरु आहे. लग्नपत्रिकेवरील अनाठाई खर्च टाळून शासनाच्या विविध प्रकल्पांना प्रोत्साहन देत लग्नपत्रिकेच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. तुषार वखरे असे त्यांचे नाव आहे.यांनी बहीणीच्या लग्नातील पत्रिकेत ‘आधार’ला आपलेसे करून ‘सहजीवनाचा आधार’च्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृतीचा प्रयत्न केला आहे.
मुलगा असो वा मुलगी दोघांचेही लग्न थाटात व्हावे, असे आई-वडीलांची इच्छा असते. साध्या धाग्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत ‘मेन्यू’ ठरविण्यासाठी कुटूंबातील सदस्य एक ना अनेकदा विचार करतात. लग्नपत्रिका जेवढी महाग तेवढे थाटात लग्न, असा समजही आता सर्वमान्य झाला आहे. पण लग्नपत्रिकेद्वारे सामाजिक संदेश, जनजागृती करता येते हा समज न समजण्यापलिकडचा आहे. पण हा समज दूर करून समाजभान राखण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे विभागीय अध्यक्ष विष्णू वखरे यांनी मुलाजवंळ बोलून दाखवला व अमलात आणला. लग्नपत्रिकेच्या माध्यमातून बेटी बचाव, बेटी पढाव, अवयवदान, पर्यावरण संरक्षण यासह शासनाच्या आधार योजनेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. २७ जानेवारी २०१९ रोजी तेजस्विनी वखरे आणि प्रशांत नाईक यांचा विवाह बालाजी मंगल कार्यालय येथे होत आहे. या लग्न सोहळा निमंत्रणाची पत्रिका हाती पडताच प्रत्येकजण हटके पत्रिका अशाच प्रतिक्रीया देत आहेत.
हुबेहुब ‘आधार‘ची प्रतिकृती
सामाजिक कार्यामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या वखरे यांचा नेहमीच सहभाग असतो. सामाजिक बांधिलकी जपत आपल्या कार्यांच्या माध्यमातून तळागाळातील प्रत्येकांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. यंदा मात्र त्यांनी खुलेआमपणे हटक्या पध्दतीने सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी मुलगी तेजस्विनीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका देताना पाकिटालाच ‘आधार’ची झलक दिली आहे. शासनाच्या आधार योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी पत्रिकेला ‘आधार’चे स्वरूप देऊन ‘सहजीवनाचा आधार‘ आशयाची पत्रिका तयार केली आहे. हुबेहुब ‘आधार’ कार्डाची प्रतिकृती असणाऱ्या पत्रिकेतून विविध प्रकारचे सामाजिक संदेशही दिले आहे.
तीन लक्षवेधी स्लोगन
लग्नाची पत्रिका हाती पडल्यानंतर प्रत्येकजण नवीन काय हे पाहण्याचा प्रयत्न करतो. ‘सहजीवनाचा आधार’ या पत्रिकेत तीन स्लोगनसह दोन लोगोद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे. समाज कार्य करताना वखरे यांनी बहुजन समाजातील मुलींना शिक्षण देण्यासाठी पालक फारसे इच्छूक नसल्याचे पाहिले, अवयवदान चळवळीचे गांभीर्य नसल्याचे त्यांनी जाणले. आणि त्यानंतर त्यांनी मुलींच्या शिक्षणाबरोबर अवयवदानास पत्रिकेच्या माध्यमातून जनजागृतीचा निर्णय घेतला. सामाजिक संदेश देण्यासाठी लग्नपत्रिका हे एक चांगले माध्यम असल्याचे त्यांचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या लोगोचा वापर करून जागृती केली. याशिवाय लग्नपत्रिकेत ‘असेल आनंदी नारी, सुख फुलेल घरीदारी’, ‘आंधळा विश्वास सोडा, अवयवदान जीवांशी जोडा’, ‘नका करू तुझं-माझं, पर्यावरण आहे सर्वांचं’ या स्लोगनच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
व्हॉटस्अप पत्रिकेतही वेगळेपण
हल्ली सोशल मिडिया सर्वांनाच आपलेसे झाले आहे. प्रत्येक गोष्टी सोशल मिडियाच्या माध्यमातून ‘शेअर’ केली जाते. तुषार वखरे यांनी हीच बाब हेरून ‘सोशल मिडियाद्वारे’ निमंत्रण देण्यासाठी तंत्रज्ञानी वाक्यरचनेचा वापर केला आहे. विवाह समारंभ म्हणजे सहजीवनाचे ‘आॅफिसीयल व्हर्जन’ असे पत्रिकेचे स्लोगन देऊन हटक्या पध्दतीने नेटीजनप्रेमींचे लक्ष वेधले आहे. ‘सी प्लस प्लस, जावा, एचटीएमएल किंवा अॅन्ड्रॉइड यापेक्षा वेगळ्या लँग्वेज मध्ये लाईफचा प्रोग्राम लिहिलेला असतो. हाच धागा पकडून लग्नातील शुभप्रसंग शेअर करण्यासाठी तसेच आशिर्वादाच्या लाईक, कॉमेन्टस् देण्यासाठी सर्वांना निमंत्रित केले आहे.