अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्तारांच्या विधानाचा सर्वच स्तरावरून निषेध करण्यात येत आहे. काल आदित्य ठाकरे यांनी ही यावरून अब्दुल सत्तारांवर टीका केली होती. दरम्यान, आज त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री याची जबाबदारी घेणार का? असा प्रश्नही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला आहे. आज औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
“मी काल काही रिपोर्ट बघितले. त्यानुसार सत्तारांनी यापूर्वीही असे प्रकार केले आहेत. त्यांचे नाव टीईटी घोटाळ्यातही आले होते. सुप्रिया सुळे एक खासदार आहेत. मात्र, कोणत्याही महिलेला अशी शिवागळ करणं हा घाणेरडा आणि गलिच्छ प्रकार आहे. त्यांच्या मनात जे आहे, ते लोकांसमोर आले आहे. त्यामुळे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एकतर त्यांना आता पदमुक्त करणं गरजेचं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी घेणार का? कारण आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाही. दुसरं म्हणजे राष्ट्रीय महिला आयोगाकडेही आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महिला सुरक्षा महत्त्वाची असेल, तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अब्दुल सत्तार यांनी हद्द पार केली आहे”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
हेही वाचा – गद्दारांनी ५० खोके घेऊन स्वतःचा दुष्काळ संपवला पण शेतकऱ्यांचं काय? – आदित्य ठाकरेंचा सवाल!
बुलढाण्यातील ‘अब्दुल गद्दार’ असा उल्लेख
दरम्यान, काल बुलढाण्यात आलेल्या सभेतही आदित्य ठाकरेंनी अब्दुल सत्तारांच्या विधानाचा समाचार घेतला होता. “आपल्या राज्यात एक घटनाबाह्य कृषीमंत्री आहेत. त्यांचं नाव ‘अब्दुल गद्दार’ आहे. या मंत्री महोदयांनी सुप्रिया सुळेंबाबत वापरलेला शब्द अतिशय घाणेरडा आहे. तो शब्द मी उच्चारूदेखील शकत नाही. एवढा घाणेरडा तो शब्द आहे. त्यामुळे मी आज थेट प्रश्न केंद्र सरकारला प्रश्न विचारतो की, असे लोकं तुम्हाला हवे आहेत का?” अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली होती.
काय आहे प्रकरण?
सोमवारी औरंगाबादमध्ये आज एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधिशी बोलताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना अपशब्दांचा वापर केला होता. सुप्रिया सुळेंनी खोक्यांवरून केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी “इतकी भि** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं विधान केले होते.