शिवसेनेचे युवा नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे हे शिवसंवाद दौऱ्यावर आहेत. काल औरंगाबाद येथे त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर आजच्या सभेत पोलिसांनी काळजी घेतली आहे. बिडकीन येथील सभेला जाण्यापूर्वी माध्यमांनी आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारत आज कोणते आव्हान देणार? असे विचारले. यावर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, आज कोणतेही आव्हान देणार नाही. रोज रोज काय आव्हान द्यायचं?
आम्ही कुणाचे वाईट चिंतित नाही
पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असल्याचे आदित्य ठाकरे यांना सागंतिले. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “आज काही आव्हान देणार नाही. वाढदिवसानिमित्त आम्ही जगात सर्वांनाच शुभेच्छा देत असतो. आमची सवय आहे की, आम्ही कुणाचेही वाईट बघत नाही. आमच्या पाठीत कुणी खंजीर खुपसले असतील, पाठीत वार केले असतील तरी देखील आम्ही कुणाचे वाईट चिंतित नाही. नेहमी आमच्याच शुभेच्छा सर्वांसोबत असतात.”
बिडकीन येथील सभेसाठी कडेकोट बंदोबस्त
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील महाल या गावी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेत अंबादास दानवे यांनी केला होता. त्यानंतर औरंगाबाद पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. आज औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन येथे आदित्य ठाकरेंची सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात केले आहेत. औरंगाबादचे पोलीस अधिक्षक मनिष कलवानीया हे स्वतः बिडकीन येथे उपस्थि आहेत. सभेच्या ठिकाणी अतिशय कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सभेला येणाऱ्यांची कसून तपासणी केली जात आहे. जे लोक सभेला विरोध करु शकतात, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांच्या सभेला कुठलाही धोका उत्पन्न होणार नाही, याची काळजी पोलिसांनी घेतली आहे.
आव्हान आणि प्रतिआव्हानांचे राजकारण
आदित्य ठाकरे यांनी मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राजीनामा देऊन वरळीतून माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान दिले होते. त्यानंतर शिंदे गट चांगलाच खवळला. आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी अनेकजण मैदानात उतरले. तर खुद्द एकनाथ शिंदे यांनी वरळीच्या मैदानातून या आव्हानाला प्रत्युत्तर दिले. आशिष शेलार यांनी देखील आदित्य ठाकरे यांना टोला लगावला. संजय राऊत यांनी मात्र शिंदे गट ३२ वर्षांच्या तरुणाला घाबरला, असे विधान केले.