Aditya Thackeray : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काल पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात आंदोलन केल्याने आज भाजपाकडून आज आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून यावरुन विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. या घटनेबाबत आता आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
“आम्ही काल जे आंदोलन केले, ते पंतप्रधान म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी केलं होतं. पण आज माझ्याकडे कोणतही पद नाही. त्यामुळे माझ्या विरोधात आंदोलन करण्याचं कोणतंही कारण नव्हते. आज आमच्या हातात काहीही नाही. आमच्या हातात सरकार दिलं तर कायद्याचा धाक काय असतो? हे आम्ही दाखवून देऊ. आम्ही शक्ती कायदा आणून दाखवला होता. मुळात ही निवडणूक आहे, लढाई नाही. त्यामुळे समोरच्या पक्षांनी हे लक्षात ठेवून वागावं, आम्ही कालचे आंदोलन केलं तेव्हा कुठेही कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन झाले नाही. आंदोलन करण्याच्या प्रत्येकाला अधिकार आहे, पण त्या आंदोलन कसं असायला पाहिजे याचं भान राजकीय पक्षांनी ठेवलं पाहिजे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“आज आमच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज झाला आहे. त्यासाठी मी पोलिसांना दोष देत नाही. त्यांना वरून कुणीतरी आदेश दिला असेल. काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांच्यावरही लाठीचार्ज झाला होता, तो हल्ला कुणाच्या आदेशावरून झाला? त्याप्रकरणी पोलिसांवर कारवाई झाली असेल. पण हल्ल्याचे आदेश नेमके कुणी दिले. मुख्यमंत्री की दोन उपमुख्यमंत्री यापैकी खरा जनरल डायर कोण? हे अद्यापही समोर आलेलं नाही. वारकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचे तसेच बदलापूरमध्ये नागरिकांवर झालेल्या हल्ल्याचे आदेश कुणी दिले सुद्धा पुढे आलेलं नाही. त्यामुळे हल्ल्याचे आदेश नेमकं कोण देतं? याचे उत्तर आधी मिळायला हवं”, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील शिंदे सरकारवरही जोरदार टीका केली. “महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. कालही एका पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला झाला. जे आमच्या अडीच वर्षांच्या काळात घडलं नाही, ते आता या दोन वर्षांच्या काळात घडत आहे. पोलिसांवर हल्ले सुरू आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बदलापूरच्या घटनेनंतर वामन मात्रे यांनी पत्रकाराला तुझ्यावर रेप झाल्यासारखे का विचारते? असा प्रश्न विचारला, मात्र त्यांना अद्यापही पक्षातून काढण्यात आलेलं नाही. मुख्यमंत्री स्वत: या सगळ्या आंदोलनाला राजकीय म्हणाले. जेव्हा जनता रस्त्यावरून आंदोलन करते तेव्हा सरकार त्यांना राजकीय म्हणते. त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो. त्यांना अटक केली जाते. मात्र, ज्यांनी बलात्कार केला, त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी दहा तास महिलेला बसाव लागलं, ही याची कामाची पद्धत आहे”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
© IE Online Media Services (P) Ltd