पाणी-विजेचा प्रश्न
बिपिन देशपांडे, लोकसत्ता
औरंगाबाद : अत्यंत अत्याधुनिक सर्व प्रकारच्या उपचारासह क्लिष्ट पद्धतीच्या शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असणारे दीडशे कोटींचे रुग्णालय औरंगाबादमध्ये उभारण्यात आले असून त्याचे हस्तांतरण वीजवाहिनी व पाण्याच्या व्यवस्थेअभावी रखडले आहे. केंद्राचे १२० कोटी व राज्य सरकारकडून ३० कोटी रुपयांच्या निधीतून हे रुग्णालय उभारण्यात आलेले आहे.
अशा प्रकारचे अत्याधुनिक उपचार पद्धतीचे रुग्णालय राज्यात औरंगाबादसह लातूर, धुळे व अकोला या चार ठिकाणी उभारण्याचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. औरंगाबादमधील रुग्णालयाची सुसज्ज इमारत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात उभारण्यात आली आहे. या रुग्णालयात चार प्रमुख विभाग आहेत. त्यामध्ये मेंदू, हृदयाची शस्त्रक्रिया होणार आहे.
एकूण २८४ खाटांच्या या रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग, दोन अतिदक्षता विभागासह चार प्रमुख कक्ष असणार आहेत. प्रत्येक कक्षात ८४ खाटा राहणार आहेत. उपचाराशी संबंधित एमआरआय ही यंत्रणा वगळता इतर २७ प्रकारची यंत्रे येथे दाखल झालेली आहेत. मात्र त्याची तपासणी विजेअभावी रखडली आहे.
या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुरेश हरभडे यांनी सांगितले की, वीज जोडणीच्या संदर्भाने काम सुरू झालेले आहे. सुमारे तीन कोटींचे हे काम आहे. रुग्णालयापर्यंत वीज जोडणी देण्याच्या संदर्भाने महावितरण कंपनीकडून खोदकामही सुरू करण्यात आलेले आहे. तर पाण्याच्या व्यवस्थेसाठी महापालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे.
चार विभागातील रुग्णांसाठी दिलासा
अपघातात मेंदूला जबर मार बसलेला असेल तर त्याची शस्त्रक्रिया या सवरेपचार (मल्टिस्पेशालिटी) पद्धतीच्या रुग्णालयात करता येणार आहे. त्यासाठीची अत्याधुनिक यंत्रणाही आलेली आहे. मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, जालनासह जळगाव, अहमदनगर आदी जिल्ह्य़ांसह पश्चिम विदर्भातील बुलडाणा या जिल्ह्य़ातील रुग्णांना येथील रुग्णालयाचा लाभ होणार आहे. दोन दिवसांपूर्वीच या रुग्णालयाची पाहणी पालकमंत्री सुभाष देसाई व जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केली आहे.
महिनाभरात हस्तांतरण
सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्णत्वास आलेले आहे. किरकोळ कामे तेवढी बाकी आहेत. वीजवाहिनी मिळाली तर उद्वाहन आदी यंत्रांची तपासणी करून इमारत हस्तांतरित करू.
– एस. के. भटनागर, प्रकल्प व्यवस्थापक