छत्रपती संभाजीनगर – माहेराहून पाच लाख रूपये घेऊन ये, यासाठी तगादा लावून नंतर रागाच्या भरात पत्नीचा गळा दाबून खून केलेला पती स्वतःच शुक्रवारी सकाळी वाळूज औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात हजर झाला. खुनाची घटना वाळूज उद्योगनगरी नजीकच्या राजणगावातील गणेशनगरात शुक्रवार पहाटे घडली. याप्रकरणी वाळूज औद्योगिक पोलिसांनी आरोपी पतीसह चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सुनीता मदन बेडवाल, असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर मदन बेडवाल असे खून करणाऱ्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी मदन बाबुसिंग बेडवाल, सासु रूखमनबाई बाबुसिंग, दीर रामेश्वर बाबुसिंग आणि सासरा बाबुसिंग बेडवाल या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतले आहे. घटनास्थळाची सहाय्यक पोलिस आयुक्त महेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे आदींनी पाहणी केली.
जालना जिल्ह्यातील वझर या गावातील बेडवाल कुटुंब कामानिमित्त वाळूजजवळच्या राजणगावातील गणेशनगरात राहतात. केवळ माहेराहून पैसे घेऊन येत नसल्याने पती मदन बेडवाल हा आपली पत्नी सुनिताचा सतत मानसिक छळ करीत होता. उभयतात नेहमीच वाद उकरून भांडण होत असायचे. घटनेच्या दिवशीही मध्यरात्री पती-पत्नीत वाद झाला. वादाने टोक गाठले. त्यातूनच मदनने पत्नी सुनीताचा गळा आवळून खुन केला. आणि वाळूज एम पोलिस ठाणे गाठून आपणच पत्नीचा गळा आवळून खुन केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.