दिवाळी सण आला आणि गेला. उत्सवाचे दिवस सरताच शेतकऱ्यांना पुन्हा एकदा तीव्र झालेल्या दुष्काळाची गडद छाया सतावू लागली आहे. मंत्री-लोकप्रतिनिधी सुस्त, प्रशासन कागदी घोडे रंगविण्यात व्यस्त आणि शेतकरीवर्ग पुरता हतबल अशा दुष्टचक्रात बीडसह जालना व उस्मानाबाद जिल्ह्य़ांतील तीव्र दुष्काळाची पाहणी करण्यासाठी येत्या बुधवारी (दि. १८) केंद्र सरकारचे विशेष पथक मराठवाडय़ात पुन्हा एकदा दाखल होत आहे. चालू दुष्काळात दोन वेळा केलेल्या पाहणी दौऱ्याचे पुढे नक्की काय झाले, हा प्रश्न कायम असतानाच मागचे पाठ पुढचे सपाट या न्यायाने दुष्काळ पाहणीच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे.
बुधवारी व गुरुवारी असे दोन दिवस केंद्राचे पथक मराठवाडय़ात दुष्काळाची पाहणी करणार आहे. बीड, जालना व उस्मानाबादमध्ये ही पाहणी होणार असून, मागील वेळेप्रमाणेच पुन्हा एकदा पाहणीनंतरचा अहवाल केंद्राला सादर केला जाणार आहे. मराठवाडय़ातील पीक स्थिती, पाणी व रोजगार हे तीन घटक समोर ठेवून ही पाहणी केली जाणार आहे. या पाहणीदरम्यान काही शेतकऱ्यांशीही संवाद साधला जाणार आहे. मात्र, केंद्राच्या पाहणी दौऱ्याची माहिती उच्च स्तरावरून देण्यात येत असली, तरी स्थानिक प्रशासन मात्र या दौऱ्याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.
मागील दोन-तीन वर्षांपासून मराठवाडय़ात सर्वत्र पावसाअभावी दुष्काळाचे चित्र तयार झाले आहे. दरवर्षी केंद्राकडून विशेष पथक मराठवाडय़ात दुष्काळाची पाहणी करण्यास येते. यापूर्वी पथकाच्या पाहणी दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना केंद्राकडून काही मदतीची अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र, प्रत्येक पाहणी दौऱ्यानंतर शेतकऱ्यांचा पुरता अपेक्षाभंग झाला. साहजिकच अचानक आणि नेमेचि होत असलेल्या केंद्राच्या दुष्काळ पाहणी पथकाच्या दौऱ्याबाबत आता शेतकऱ्यांनाही पुरेसे गांभीर्य वाटेनासे झाले आहे.
बीड जिल्ह्य़ात सध्याच सुमारे सव्वादोनशे गावांना १०९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मराठवाडय़ात येत्या दिवसांत किमान ५०० टँकरने पाणीपुरवठय़ाचे नियोजन करावे लागणार आहे. यापूर्वी वेळोवेळी केंद्राची पथके मराठवाडय़ात येऊन गेली. या पथकांनी केंद्राला अहवाल सादर केला. मात्र, या अहवालावर नेमकी काय कार्यवाही झाली, या बाबत नकारघंटाच प्रत्ययास आली आहे. साहजिकच आताही दाखल होत असलेल्या पथकामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काही पडणार काय, या विषयी आताच साशंकता व्यक्त होत आहे. पाहणीचा केवळ उपचार एवढेच या दौऱ्याचे स्वरूप असल्याची टीका शेतकरीवर्गातून केली जात आहे.

Story img Loader