भाजी मंडईतील कामगारांना माथाडी कायदा लावून त्याची कडक अंमलबजावणी करावी. तसेच विविध आस्थापनांकडील थकबाकीची वसुली करावी या मागणीसाठी मराठवाडा लेबर युनियनच्या वतीने शुक्रवारी माथाडी कामगारांनी मोर्चा काढला. हा मोर्चा शुक्रवारी सकाळी ११ वाजता क्रांती चौकातून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मागण्या मान्य न झाल्यास प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवू, असा इशारा या वेळी देण्यात आला.
शहरात अनेक ठिकाणी माथाडी कामगार काम करीत आहेत. त्यामध्ये भाजी मंडईत माथाडी कामगारांना कायद्याचे संरक्षण मिळत नसल्याचे मराठवाडा लेबर युनियनच्या वतीने सांगण्यात आले. माथाडी कायद्यानुसार रोजंदारीची मागणी केल्यास काही जणांना कामावरून काढून टाकण्यात आले, त्यांना पूर्ववत कामावर घ्यावे, हमाल-मोलकरणी-कचरा कामगारांना २ रुपये किलो दराने गहू देणाऱ्या अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ मिळावा, कष्टकऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना राबवा, वृद्धापकाळात पेन्शन सुरू करावी, शासकीय गोदामातील माथाडी कामगारांच्या पाठीचा लिलाव तत्काळ बंद करा आदी मागण्यांसाठी मराठवाडा लेबर युनियनने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते.
मोर्चानंतर उपजिल्हाधिकारी डॉ. रवींद्र राजपूत यांची मराठवाडा लेबर युनियनच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यामध्ये सुभाष लोमटे, अॅड सुभाष गायकवाड सावंगीकर, देविदास कीर्तिशाही आदींचा समावेश होता. येत्या आठवडाभरात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन डॉ. राजपूत यांनी शिष्टमंडळास दिले.

Story img Loader