ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल (AIMIM) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी किराणा दुकान आणि सुपर शॉपीत वाईन विक्रीला परवानगी दिल्याच्या निर्णयावर थेट ठाकरे सरकारला आव्हान दिलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सत्ताधारी सर्व पक्षांनी हिंमत असेल, तर औरंगाबादमध्ये किराणा दुकान किंवा सुपर शॉपीत वाईन शॉप उघडून दाखवावा, असं आव्हान जलील यांनी दिलं. तसेच जर औरंगाबादमध्ये किराणा दुकान आणि सुपर शॉपीत वाईन विक्री सुरू झाली तर ते दुकान फोडण्याची जबाबदारी माझी असेल, असं म्हणत त्यांनी इशारा दिलाय. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इम्तियाज जलील म्हणाले, “अजित पवार आणि संपूर्ण महाराष्ट्र सरकार, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मी आव्हान देतो. तुमच्यात हिंमत असेल तर औरंगाबादमध्ये कोणत्याही किराणा दुकान किंवा सुपर शॉपीत वाईन शॉप उघडून दाखवा. किराणा दुकानात एक जरी वाईन शॉप सुरू झालं तर मी स्वतः आणि माझे कार्यकर्ते ते फोडतील. इतकंच नाही तर महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, फुले-आंबेडकरांना मानणाऱ्या जनतेला आणि माझ्या आया-बहिणींनी जिथं किराणा दुकानात वाईन दिसेल ते दुकान फोडा.”

“वाईन दारूच्या व्यसनाची पहिली पायरी”

“औरंगाबादमध्ये कुठेही किराणा दुकान किंवा मॉलमध्ये वाईन शॉप उघडले, तर इम्तियाज जलील त्याला फोडणार हे मी स्पष्ट सांगतो. त्यामुळे १००० चौरस फुटात मी वाईन शॉप सुरू करेल असं कुणाच्या मनात असेल, तर त्यांनी त्या भ्रमात राहू नये. वाईन हे दारूच्या व्यसनाची पहिली पायरी आहे. ते म्हणतील वाईनमध्ये काय होतं. उद्या याच लहान मुलांच्या हातात बिअर बॉटल्स दिसणार आहेत. याच मुलांच्या हातात विस्कीची बॉटल दिसेल,” असं इम्तियाज जलील यांनी सांगितलं.

“शेतकऱ्यांचा फायदा होण्यासाठी दुधावर निर्णय का नाही?”

इम्तियाज जलील म्हणाले, “सरकार म्हणतं वाईन विक्रीने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. मग शेतकऱ्यांकडे गाय-म्हैस नसतात का? दुधासाठी सरकारने का निर्णय घेतला नाही. सरकारला यालाच परवानगी द्यायची असेल, तर त्यांनी शेतकऱ्यांना गांजा-चरसची शेती करण्याचीही परवानगी द्यावी. कारण त्यातून शेतकऱ्यांना फायदा होईल. सरकार फक्त पैशासाठी महाराष्ट्राच्या संस्कृतीला उद्ध्वस्त करत आहेत. तसेच एक नवीन संस्कृती तयार करण्याचा प्रयत्न करत आहात. ते आम्ही कदापि सहन करणार नाही.”

हेही वाचा : VIDEO: “दारू स्वस्त असो किंवा महाग, दारू औषधाचं काम करते आणि…”, भाजपा खासदार प्रज्ञा सिंह यांचं वक्तव्य

“औरंगाबादमध्ये एकही वाईन शॉप दिसणार नाही, ते फोडण्याची जबाबदारी माझी”

“माझं खुलं आव्हान आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगाबादमध्ये एका वाईन बारच्या उद्घाटनासाठी यावं. औरंगाबादमध्ये एकही वाईन शॉप दिसणार नाही. ते फोडण्याची जबाबदारी माझी, औरंगाबादमधील माझ्या आया-बहिणी आणि कार्यकर्त्यांची असेल. ते सर्व माझ्यासोबत उभे राहतील,” असंही इम्तियाज जलील यांनी नमूद केलं.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aimim imtiaz jaleel challenge mva government over wine shop decision pbs