छत्रपती संभाजीनगर: अजिंठा लेणीतील चित्र हेच आपल्या आयुष्याचा ध्यास बनवून कुंचल्यातील कधी पद्मपाणी तर कधी वज्रपाणी चित्र साकारणारे प्रसिद्ध चित्रकार विजय कुलकर्णी यांचे सोमवारी मध्यरात्री पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. अजिंठा चित्रांबरोबर अमूर्त शैलीतील त्यांचे चित्र प्रसिद्ध होते. जे. जे स्कुल ऑफमधून १९७० दशकात प्रशिक्षण घेऊन अजिंठा शैलीतील चित्रांसाठी त्यांनी आयुष्य वेचले. शब्दांनी कमी आणि चित्रातून व्यक्त होणारे विजय कुलकर्णी यांचा म्यूरल पेंटिंगमध्ये विशेष हातखंडा होता. सईद हैदर रझा, एस. व्ही. वासुदेव, चार्ल्स कोरिया, ज्ञानेश्वर नाडकर्णी, सारा अब्राहम आदी दिग्गजांनी त्यांना नावाजले होते.
हेही वाचा : पुनरुज्जीवन.. अजिंठा लेणीचित्रांचे!
मुंबईहून संभाजीनगर येथे स्थायिक झाल्यावर कुलकर्णी यांनी १९८२ मध्ये वेरूळ येथे ‘रॉक आर्ट गॅलरी’ सुरू केली. जे. जे. स्कूल, ललित कला अकादमी, एअर इंडिया, मंत्रालय, विधान भवन, राष्ट्रपती भवन, परराष्ट्र मंत्रालयासह विविध पंचतारांकित हॉटेल्समध्ये विजय कुलकर्णी यांची चित्रे लक्ष वेधून घेत आहेत. भारताबाहेरही अनेक देशांत त्यांची चित्रे नावाजली गेली. विजय कुलकर्णी यांच्यावर मंगळवारी सकाळी पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी सुलभा, विक्रांत आणि विराज ही दोन मुले, सुना, नात आणि वहिनी असा परिवार आहे.