Ajit Pawar on Hasan Mushrif ED Raid : ईडीने बुधवारी (११ जानेवारी) सकाळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर छापे टाकले. कागल आणि पुण्यात काही ठिकाणांवर ही करावाई झाली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देत या कारवाईचा निषेध केला. आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. “माझं स्पष्ट मत आहे की, केंद्रात आणि राज्यात कोणाचंही सरकार असो, राजकीय द्वेषातून कारवाई करू नये,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.
अजित पवार म्हणाले, “माझं स्पष्ट मत आहे की, केंद्रात आणि राज्यात कोणत्याही पक्षाचं, आघाडीचं किंवा युतीचं सरकार असो राजकीय द्वेषातून कोणत्याही सरकारने कारवाई करू नये. काही आमदार एकनाथ शिंदेंबरोबर गेले आहेत, तर काही आमदार मूळ शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंबरोबर राहिले आहेत.”
“ठाकरे गटाबरोबर असणाऱ्या आमदारांच्या चौकशा”
“ठाकरे गटाबरोबर असणाऱ्या आमदारांपैकी कोकणातील आमदार राजन साळवी, विदर्भातील आमदार नितीन देशमुख आणि कोकणातीलच सिंधुदुर्गचे आमदार वैभव नाईक या तिघांवर एसीबीच्या चौकशा लावण्यात आल्या,” असा आरोप अजित पवार यांनी केला.
हेही वाचा : ईडीने छापे टाकल्यानंतर शरद पवारांशी बोलले का? हसन मुश्रीफ म्हणाले, “मी त्यांच्याशी…”
“जे घडतं आहे त्याला राजकीय रंग असल्याची शंका”
“केंद्र सरकारच्या आयकर विभाग, ईडी, एनआयए, सीबीआय यांना घटनेने, कायद्याने देशातील कुठल्याही व्यक्तीची चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील सरकारच्या सीआयडी, एसीबी किंवा पोलीस विभाग या सर्व यंत्रणांना चौकशी करण्याचा अधिकार आहे. मात्र, आत्ता जे घडतं आहे त्याला राजकीय रंग आहे अशी शंका काहींच्या मनात उपस्थित होत आहे,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.
नक्की पाहा – Photos: ईडीने छापेमारी केलेल्या हसन मुश्रीफ यांची एकूण संपत्ती माहीत आहे का?
काय म्हणाले हसन मुश्रीफ?
“माझ्या आणि माझ्या मुलीच्या घरावर ईडीने छापे टाकल्याची माहिती मला मिळाली आहे. मी कामानिमित्त बाहेगावी असल्याने दुरध्वनीवरून मला ही माहिती मिळाली. माझा कारखाना, नातेवाईकांची घरं तपासण्याचे काम सुरू आहे. माझ्यावरील ईडीच्या या कारवाई विरोधात कागल बंदची घोषणा कार्यकर्त्यांनी दिली असल्याचेही मला समजलं आहे. त्यामुळे माझी कार्यकर्त्यांनी विनंती आहे, की त्यांनी हा बंद मागे घ्यावा आणि शांतात राखावी, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही वर्तन कार्यकर्त्यांनी करू”, असे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा : विश्लेषण : ईडी खरंच विरोधकांना लक्ष्य करते? आकडेवारी काय सांगते? वाचा सविस्तर
पुढे बोलताना ते म्हणाले, “दीड दोन वर्षांपूर्वीही ईडीने असाच प्रकारे माझ्या घरांवर छापे टाकले होते. तेव्हा सर्व माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी घेतली होती. त्यात काहीही निष्पन्न झालं नव्हतं. मग पुन्हा कशासाठी छापेमारी करण्यात आली, याबाबत मला माहिती नाही. याबाबत सर्व माहिती घेतल्यानंतर सविस्तर प्रतिक्रिया देईन.”