अजित पवार यांच्या समावेशाबाबतही साशंकता
दुष्काळप्रश्नी सोमवारी (दि. १४) होणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन अध्यक्ष शरद पवार यांच्याशिवाय करण्यात येणार आहे. या बरोबरच माजी उपमुख्यमंत्री अजित पवारही या आंदोलनात सहभागी होतील की नाही हे आम्ही कळवू, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. जालना जिल्ह्यातील मोर्चाचे नेतृत्व मात्र खासदार सुप्रिया सुळे करणार आहेत.
उस्मानाबाद येथे आंदोलनाची घोषणा करताना जनावरांसह जेलभरो करण्याचे पवार यांनी जाहीर केले होते. दुष्काळी भागातील स्थितीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यामुळे मराठवाडय़ातील हे आंदोलन राष्ट्रवादी अधिक मोठय़ा स्वरूपाचे करेल व त्यात स्वत: पवार सहभागी होतील, असे मानले जात होते. आंदोलनाची घोषणाच त्यांनी केली असल्याने साहजिकच ते नेतृत्व करतील, अशी धारणा होती. तथापि आंदोलनात ते प्रत्यक्ष सहभागी होणार नाहीत. पवार यांच्या घरातील व्यक्ती सहभागी होणार का, या प्रश्नाच्या उत्तरात आम्ही सर्वच पवार फॅमिलीच आहोत असे स्पष्ट करीत तटकरे यांनी सुप्रिया सुळे जालना जिल्ह्यात सहभागी होतील. अजित पवार यांचा सहभाग असेल का, याचे उत्तरही नंतर दिले जाईल, असे सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस व सरकारवर टीका करीत तटकरे यांनी या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी पवार यांच्यावर अलीकडेच केलेल्या टीकेला उत्तर दिले. काही विस्मृतीत गेलेले नेते माध्यमांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांवर टीका करतात. लोणी परिसरातील पाच-पन्नास गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी पवार यांच्यावर बोलूच नये, असे ते म्हणाले. फूस लावलेल्या नेत्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.

‘सरकारमध्ये कोणी शेतकरी आहे की नाही?’
राज्याची कर्ज घेण्याची पत आहे. फक्त सरकारची इच्छाशक्ती नसल्याचे सांगत त्यांनी फडणवीस सरकारवर टीका केली. दुबार पेरणीसाठी जाहीर केलेली मदत एकरी ६०० रुपये देण्याचे ठरविण्यात आले. यावरून या सरकारमध्ये कोणी शेतकरी आहे की नाही, असा प्रश्न पडतो, असे सांगत माजी मंत्री सुनील तटकरे यांनी भाजपवर टीका केली.