छत्रपती संभाजीनगर : ‘वाघ्या’ समाधीवरुन छत्रपती संभाजीमहाराज यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फटकारले आहे. ते म्हणाले, मला एक कळत नाही महाराज १६८० ला गेले. एवढे वर्ष झाले त्याला. आता २०२५ मध्ये असे जुने मुद्दे का काढले जातात. ही समाधी आज आहे ? चव्हाण साहेबांनी संयुत महाराष्ट्र कलश तिथे नेला, पंतप्रधान राष्ट्रपती तिथे येऊन गेले. मुद्दा मांडायचा अधिकार सगळ्यांना आहे. पण यापेक्षाही महत्त्वाचे मुद्दे आहेत. कृत्रिम बुद्धीमत्तेचे एक मोठे आव्हान आहे. शेतीचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणे हे पण मोठे काम बाकी आहे. कालानुरूप बदलावे लागते. पण मधूनच कुणी नवे वक्तव्य करतात आणि तेवढ्यापुरती चर्चा सुरू होते. यापेक्षा रोजगार उद्योगांवर बोला, असे अजित पवार म्हणाले.
आर्थिक शिस्त आणण्याचा प्रयत्न करतो आहाेत. अर्थसंकल्पावर काहींनी कौतुक केले काहींनी टीका केली, राज्याची आर्थिक घडी बसवून पुढे न्यायचे आहे. महाराष्ट्राचे नाव पुढे नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कांदा निर्यातीसाठी २० टक्के कर सवलत दिल्याने उत्पादक शेतकरी व ग्राहकांना फायदा होणार असल्याचा दावा त्यांनी केला.