छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा पार पडत आहे. तर, दुसरीकडे भाजपा आणि शिवसेनेच्या( शिंदे गट ) वतीने संभाजीनगरमध्ये वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीकास्र डागलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यावर दातखीळ बसली होती का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
“तत्कालीन राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला. सरकारमधील मंत्री, प्रवक्ते आणि आमदारांनीही बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान करण्याचं काम केलं. तेव्हा दातखीळ बसली होती का? त्यावेळी का गौरव यात्रा काढण्यात आल्या नाहीत,” असं अजित पवारांनी म्हटलं.
हेही वाचा : “…तर आमदारकी कधी जाईल सांगता येत नाही”, संभाजीनगरमध्ये धनंजय मुंडेंचं विधान
“आम्हाला सर्व महापुरूषांबद्दल आदर आहे. सर्व महापुरुषांनी तेव्हा काम केलं, म्हणून आपण हे दिवस पाहतोय. त्यांच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं. वीर सावरकर यांच्याबाबत काही वक्तव्य करण्यात आली. पण, काही वडिलधारी लोकांच्या मध्यस्तीने ते सुद्धा वातावरण शांत झालं. आज संभाजीनगरमध्ये सभा होत असताना, जाणीवपूर्वणक दोन केंद्रीय मंत्री आणि राज्यातील तीन मंत्री गौरव यात्रा काढत आहेत,” अशी टीका अजित पवारांनी केली.
हेही वाचा : “पोलिसांना मस्ती आली असेल, तर…”; संभाजीनगरमधील सभेतून अंबादास दानवेंची थेट धमकी, नेमकं काय घडलं?
“गौरव यात्रा काढण्यास आमचा विरोध नाही. पण, दुटप्पीपणा करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घेऊन सरकारमध्ये आलात. छत्रपतींचा अपमान झाल्यावर राज्यपालांना कोण काही बोललं नाही. हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. याचा विसर महाराष्ट्राला पडणार नाही,” असेही अजित पवारांनी म्हटलं.