छत्रपती संभाजीनगर / अलिबाग : गेल्या काही दिवसांत राज्यात असलेल्या ढगाळ हवेचा फटका फळबागांना बसला आहे. फळगळती, मंगू रोगाचा प्रादुर्भाव यामुळे मराठवाड्यात मोसंबी उत्पादक चिंतेत आहेत. तर मळभ, ओसरलेली थंडी आणि अवकाळी पावसाचा आंब्यावर परिणाम होण्याची भीती कोकणातील बागायतदारांना सतावत आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना व बीडच्या काही भागांत मिळून ४१ हजारांवर हेक्टरपर्यंतचे मोसंबीचे क्षेत्र आहे. मात्र मराठवाड्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून थंडी गायब झालेली असून सकाळच्या वेळात ढगाळ वातावरण असते. त्यामुळे मोसंबीची फळगळती होत असून अनेक भागांमध्ये मंगू रोगाचाही प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे संपूर्ण फळ हिरव्याऐवजी काळ्या रंगाने मिश्रित दिसते आहे. परिणामी त्याला बाजारपेठेत हातही लावला जात नाही. या फळाला टनामागे चार-साडेचार हजार रुपयांचाच दर मिळत असल्याचे उत्पादक विश्वंभर हाके यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड बाजारपेठेत मोसंबीला टनामागे साधारणपणे १० हजार रुपये मिळाले. आठ-दहा दिवसांपूर्वी हाच दर २५ हजारांच्या घरात असल्याचे व्यापारी मुजफ्फर शेख यांनी सांगितले.
हेही वाचा : एसटी बसमध्ये प्रवासात अश्लील चित्रफीत दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
दुसरीकडे कोकणातही फळांच्या राजाला लहरी हवेचा फटका बसत असल्याचे चित्र आहे. ढगाळ हवेमुळे तुडतुडे, पांढरी माशी, मावा या अळ्यांचा प्रादुर्भाव होत आहे. ढगाळ हवेमुळे आर्द्रता वाढून तुडतुड्या आणि करपा रोगाचा धोका आहे. ओसरलेली थंडी आणि येत्या दोन दिवसांत पाऊस पडण्याचा अंदाज यामुळे आंब्यावर तिहेरी संकट कोसळण्याची धास्ती आहे. अवकाळी पाऊस झाल्यास त्याचा मोठा फटका मोहोराला बसू शकतो. आधीच उशिरा सुरू झालेल्या थंडीमुळे हंगाम लांबला असतानाच या संकटांमुळे उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे. पावसाच्या शक्यतेमुळे बागायतदारांनी बुरशीनाशक, कीटकनाशक फवारणी सुरू केली आहे.
मंगू रोगाचे कारण आणि उपाय
तणनाशकाच्या अतिवापरामुळे फळांवर अष्टपाद कोळीचा प्रादुर्भाव होतो. कोळी जाळे पसरवतो व विष्ठा फळावर टाकतो. त्यातून मोसंबी काळी पडते. त्याला मंगू रोग म्हटले जाते. एक लिटर पाण्यासाठी दीड ग्रॅम या प्रमाणानुसार माइटी साइट (गंधक-कोळीवर्गीय कीडनाशक) फवारावे, असा सल्ला कृषी महाविद्यालयाचे निवृत्त सहयोगी अधिष्ठाता डॉ. एम. बी. पाटील यांनी दिला.