छत्रपती संभाजीनगर : औषध दुकानांतील त्रुटींबाबत अन्न व औषध मंत्र्यांकडे केले जाणारे अपील निकाली काढण्यासाठी मंत्र्यांचे स्वीय साहाय्यक लाच मागत असल्याचा आरोप ‘द महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन’चे सचिव अनिल नावंदर यांनी केला आहे. राठोड यांच्या मंत्रालयातील भ्रष्टाचाराकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी पत्राद्वारे दिला आहे.
औषध विकेत्यांकडून होणाऱ्या छोटय़ा चुकांसाठी दुकानांचा परवाना काही कालावधीसाठी बंद करण्याची कारवाई केली जाते. कारवाई जास्त दिवसांची असेल, तर औषध विक्रेते त्याविरोधात मंत्र्यांकडे अपील करतात. मंत्र्यांकडे अपिलातील ५०० हून अधिक प्रकरणे दाखल असून, ते त्यावर कार्यवाहीच करत नाहीत. मात्र, स्वीय साहाय्यक विशाल राठोड आणि संपत डावखर तसेच चेतन करोडीदेव हे लाच मागत असल्याचा आरोप नावंदर यांनी केला आहे.
याप्रकरणी पूर्वीही तोंडी तक्रारी केल्यानंतर कामकाजात सुधारणा होईल, असे वाटले होते. मात्र, त्यात बदल होत नाही. उलट ‘रक्कम’ वाढत असल्याचे नावंदर यांनी पत्रात म्हटले आहे. संजय राठोड यांच्या विभागात लक्ष घालून योग्य ते निर्देश देण्याची विनंती त्यांनी केली आहे. या पत्राची प्रत त्यांनी अन्न व औषध विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनाही पाठवली आहे.
‘द महाराष्ट्र स्टेट केमिस्ट्स अॅन्ड ड्रगिस्ट्स असोसिएशन’ने केलेल्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही. आमच्या विभागाने असोसिएशनमधील अनेकांवर विविध तक्रारींसंदर्भात कारवाई केली आहे. या कारवाईस स्थगिती मिळावी, यासाठी आपल्यावर दबाव आणण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे. मात्र, आपण कोणाच्याही दबावाला बळी पडणार नसून, कोणत्याही प्रकरणात काही गैर आढळले तर कारवाई केली जाईलच.