सेनगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिल्यामुळे काँग्रेस, शिवसेना व मनसे या तीन पक्षांना एकत्र येणे अखेर भाग पडले आहे. या तिन्ही पक्षांची स्थानिक पातळीवर युती होऊन अध्यक्षपद सव्वा-सव्वा वर्ष, तर उपाध्यक्षपद अडीच- अडीच वर्ष अशी वाटाघाटी झाली असल्याचे माजी आमदार भाऊ गोरेगावकर यांनी पत्रकार बैठकीत जाहीर केले.
नगरपंचायत अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख उद्याची (शुक्रवार) आहे. सेनगाव नगरपंचायतीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. दोन पक्ष एकत्र आले तरी सत्ता स्थापन करता येत नाही. येथे त्रिशंकू निकाल लागल्याने तीन पक्ष एकत्र येऊनच सत्ता स्थापन करावी लागणार आहे. त्यामुळे निवडून आलेल्या काँग्रेसच्या चार, शिवसेनेचे दोन, मनसेचे तीन यांची एकत्र बठक झाली. त्यानंतर गुरुवारी गोरेगावकर यांच्या निवासस्थानी पत्रकार बठक घेतली. शिवसेनेचे जि. प. सदस्य ओमप्रकाश देशमुख, सेनेच्या सदस्या गयाबाई खंदारे यांचे पती विष्णू खंदारे, सेनेच्या नगरसेविका शिल्पा तिवारी यांचे पती जगदीश तिवारी, मनसेचे जिल्हाप्रमुख प्रमोद कुटे, उपप्रमुख संदेश देशमुख, काँग्रेसचे विलास खाडे, द्वारकादास सारडा, प्रकाश देशमुख आदींची उपस्थिती होती.
मनसे जिल्हाप्रमुख कुटे, तसेच सेनेचे जि. प. सदस्य देशमुख यांनी निवडणूक निकाल त्रिशंकू लागल्याने ३ पक्षांना एकत्र यावे लागले. पहिले सव्वावर्ष काँग्रेसचा अध्यक्ष, दुसरे सव्वावर्ष शिवसेनेचा अध्यक्ष तर या अडीच वर्षांत मनसेला उपाध्यक्षपद, दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सव्वावर्षांत मनसेचा अध्यक्ष, तर दुसऱ्या सव्वावर्षांत काँग्रेसचा अध्यक्ष व शिवसेनेला अडीच वर्ष उपाध्यक्षपद देण्याबाबत या तिन्ही पक्षांतील प्रमुखांचे एकमत झाले. वरिष्ठांकडून त्याला संमती मिळाल्याचे सांगण्यात आले.
सेनगाव बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस-भाजप एकत्र आले. मात्र, या वेळी भाजप व काँग्रेसची युती का झाली नाही? या प्रश्नावर गोरेगावकर यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र आले तरी येथे सत्ता स्थापन करता येत नाही. तिसऱ्या पक्षाचा टेकू घ्यावाच लागतो, यापूर्वी िहगोली व सेनगाव पंचायत समितीत मनसे आमच्यासोबत होती. पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निकाल जाहीर होताच शिवसेना, मनसेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्थानिक स्तरावरील निवडणुकीत परिस्थितीप्रमाणे पदाधिकाऱ्यांना निर्णय घेता येतात व तसा तो त्यांनी घेतला असल्याचे सांगितले.
औंढा नागनाथ नगरपंचायतमध्ये भाजप-शिवसेना एकत्र आले, तेव्हा शिवसेनेच्या वरिष्ठांची या युतीला संमती आहे काय? या प्रश्नावर शिवेसनेचे देशमुख म्हणाले की, भाजपसोबत युती करूनही सत्ता स्थापन करता येत नाही. मनसे व शिवसेना यांच्यात प्रथम युती झाली व नवनिर्वाचीत ५ नगरसेवकांनी काँग्रेससोबत युती करण्याचा निर्णय घेतला. शिवसेना जिल्हाप्रमुखांची या युतीला संमती असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
काँग्रेसकडून अध्यक्षपदाचा उमेदवार कोण? असे विचारले असता विलास खाडे उद्या (शुक्रवारी) उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यांच्या उमेदवारीला शिवसेना मनसेच्या नगरसेवकांचा पाठिंबा असेल, असे गोरेगावकर यांनी सांगितले. शिवसेना, मनसे, काँग्रेसचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा