अल्पावधीत नावारुपाला आलेल्या अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेने मार्चअखेर २५९ कोटी १२ लाख रुपयांच्या ठेवी जमा करुन १ कोटी ३८ लाख ४७ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवला. मुख्य शाखेसह १६ शाखांचा विस्तार झालेल्या बँकेने ग्राहकांना उत्तम तात्काळ सेवा देण्याचा प्रयत्न करुन विश्वास संपादन केल्यामुळे आगामी वर्षांत बँकेच्या इतरही शाखांमध्ये एटीएम सेवा सुरू करणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.
अंबाजोगाई शहर व परिसरातील सर्वसामान्य माणसाला उद्योग व्यवसायासाठी आíथक पतपुरवठा करण्याच्या उद्देशाने १९९६मध्ये अंबाजोगाई पीपल्स को. ऑप. बँकेची स्थापना झाली. अनेक तरूण उद्योजकांना बँकेने पतपुरवठा करुन स्वतच्या पायावर उभे केले. बँकेच्या मुख्य कार्यालयासह मराठवाडय़ात १६ शाखांचा विस्तार झाला आहे. अंबाजोगाई शहरात बँकेने एटीएम सेवा उपलब्ध करुन दिली. भविष्यात इतर शाखांमध्येही ही सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. बँकेचे पूर्ण संगणकीकरण झाले असून देशातील प्रमुख शहरांमध्ये देय असलेल्या डीडीची सुविधा उपलब्ध करुन दिली. तत्काळ सोने तारण कर्ज, ठेव विमा योजना, ज्येष्ठ नागरिक व सहकारी संस्थांसाठी अर्धा टक्का ज्यादा व्याज दिले जाते. वाहन कर्ज, गृह, वैयक्तिक, लघुउद्योग त्याचबरोबर ग्राहकांना एसएमएसद्वारे बँकिंग सुविधाही उपलब्ध करुन दिली आहे.
सरत्या आíथक वर्षांत ३१ मार्चअखेर सभासद संख्या ९ हजार ८५३ असून बँकेकडे २५९ कोटी १२ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेने १६९ कोटी २६ लाख रुपयांचे कर्जवाटप केले असून, ७ कोटी ३७ लाखांचे वसूल भागभांडवल व १७ कोटी ९४ लाख रुपयांचा स्वनिधी आहे. एनपीएचे प्रमाण ३.१९ टक्के आहे. बँकेने १०५ कोटी ७ लाख रुपयांची गुंतवणूकही केली असून बँकेला वर्षभरात १ कोटी ३८ लाख ४७ हजार रुपयांचा नफा झाल्याने सहकार विभागाने लेखा परीक्षणाचा ‘अ’ दर्जा दिला असल्याची माहिती अध्यक्ष मोदी यांनी दिली.
अंबाजोगाई पीपल्स बँकेला १ कोटी ३८ लाखांचा नफा
अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेने मार्चअखेर २५९ कोटी १२ लाख रुपयांच्या ठेवी जमा करुन १ कोटी ३८ लाख ४७ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवला.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 09-04-2016 at 01:30 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambajogai bank 1crore 38 lakh profit