हिंगोली-अकोला रस्त्याची अवस्था कनेरगाव नाक्यापर्यंत दयनीय झाल्याने या रस्त्याची ओळख मृत्यूचा सापळा अशीच झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आलेला दोन कोटींचा निधी रस्त्यावर काळी माती टाकल्याने खड्डय़ात गेला. मात्र, आता या रस्त्याचे काम नव्याने प्राप्त निधीतून मंगळवारी कनेरगावाकडून हिंगोलीकडे सुरू झाले आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग हिंगोलीअंतर्गत अकोला-वाशिम-कनेरगाव-वारंगा महामार्ग २०४, सध्याचा महामार्ग १६१ येतो. सन २०१३-१४ पासून आतापर्यंत रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली रस्त्याची वाट लागली. सन २०१२-१३पासून हा रस्ता पूर्ण खराब झाला. डांबरी पृष्ठभागावर खड्डे काळ्या मातीने भरले व पूर्ण रस्ता खराब केला. त्यात भर पडली २०१३ च्या अतिवृष्टीची. अतिवृष्टीत रस्त्यावर पुन्हा काळी माती भरल्याने रस्त्याचे पूर्णत: तीन-तेरा वाजले. खड्डयांत मातीचा भराव भरल्यामुळे वाहनधारक अक्षरश: घसरून जिवाला मुकले. विशेषत: किती तरी नवदाम्पत्य अपंग झाले. रस्त्यावर प्रचंड वाहतूक असल्यामुळे कित्येक मालमोटारींचे अपघात झाले.
रस्ता दुरुस्तीसाठी सरकारने भरीव मदत दिली. परंतु अधिकारी व कंत्राटदारांच्या संगनमतामुळे दुरुस्तीचे काम कागदोपत्रीच जिरले. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एकूण २ कोटी १० लाख निधी मंजूर करण्यात आला. प्रत्यक्षात रस्ता काळ्या मातीचाच राहिला. या महामार्गाच्या दुरुस्तीवर खासदार राजीव सातव यांनी लोकसभेत आवाज उठवला. केंद्रीय मंत्री गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन रस्ता रुंदीकरणासह दुरुस्ती कामावर निधी मंजूर करून घेतला.
हिंगोली ते कनेरगावपर्यंत सुमारे १७ कोटी, हिंगोली-कळमनुरी, कळमनुरी-वारंगा प्रत्येकी १५ कोटी या प्रमाणे तीन तुकडय़ांत हे काम होणार असून या कामावर एकूण ४७ कोटी खर्च मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रियेचे काम दीड महिन्यापूर्वी पूर्ण झाले. मंगळवारपासून तीन तुकडय़ात असलेल्या कामाचा प्रारंभ कनेरगावकडून हिंगोलीकडे सुरू झाला. दरम्यान, रस्त्याच्या कामावर झालेल्या खर्चाविषयी डॉ. अमोल अवचार यांनी माहिती अधिकाराद्वारे माहिती मागितली आहे.

Story img Loader