छत्रपती संभाजीनगर: २०१७ मध्ये पटेल आंदोलनच्या काळात आम्हाला गावोगावी येऊ दिले जात नव्हते. नकारत्मकता होती सगळेकडे. पण तेव्हा केवळ रणनीतीच्या आधारे आम्ही विरोधकांच्या तोंडचा घास काढून घेतला हाेता. कृषी मालांचे भाव, मराठा आंदोलन किंवा अन्य सर्व चिंता तुम्ही राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस व अन्य नेत्यांवर सोडा, तुम्ही फक्त मतदान केंद्राची वर्गवारी करुन दहा टक्के मतदान वाढवा, पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम राबवा मराठवाड्यातील ३० जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास मनाशी बाळगा असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असंभवला संभव करणे हे भाजपचे काम आहे. निवडणुका जोशमध्ये नाही तर रणनीतीने लढविल्या जातात. मराठा आंदोलनाची , दलित किंवा शेतकरी नाराजींबाबतची मते याची आम्हाला कल्पना आहे. फक्त कार्यकर्त्यांनी तोंड पाडून काम करू नये. लोकसभा निवडणुकीमध्ये विजय भाजपचाच झाला आहे. पंतप्रधान पदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी बसले आहेत. पंडित जवाहरलाल नेहरु नंतर तेच एकमेव सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळे राहुल गांधीच्या प्रभावात आला आहात का, असा सवाल अमित शहा यांनी केला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी उत्तर म्हणून ‘ पप्पू, पप्पू’ असे म्हणत शहा यांच्या वक्तव्याला उत्तर दिले. ४५ टक्के मते असणारा एक पक्ष असेल आणि दुसरा ५५ टक्के मते असणारा पक्ष असेल तर जिंकणारा पक्ष ५५ टक्के मते घेणारा असेल असा आपला समज होतो. पण ५५ टक्के मते असणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांनी जर ७० टक्के मतदान करुन घतले आणि ४५ टक्के मते असणाऱ्यांनी ९० टक्के मतदान करुन घेतले तर निवडून येणारा पक्ष ४५ टक्क्यांचा असतो. त्यामुळे जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे शहा म्हणाले. असंभव बाबीच संभव करणे म्हणजे भाजप, हे ब्रीद लक्षात घेऊन काम करावे लागणार आहे. पूर्वीही भाजपने असेच काम केले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जनसंघाचा ‘ दिवा’ हाती घेऊन कॉग्रेसने निवडलेला रस्ता चुकीचा आहे हे सांगत दोन जण निवडून आले होते तेव्हाही टर उडवली जायची. पण आता १७ – १८ राज्यात भाजपची सत्ता आहे, असे शहा यांनी आवर्जून सांगितले.

हेही वाचा >>>तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरु, घटस्थापना ३ ऑक्टोबरला, तर १३ ऑक्टोबरला सिमोल्लंघन

महाराष्ट्र, झारखंड व ओरिसाची निवडणूक मनोबल वाढवणारी

एखाद्या निवडणुकीचा प्रभाव एखाद्या जिल्ह्यावर पडतो किंवा एखाद्या राज्यावर. पण येणारी भाजपची निवडणूक ही भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढणारी व ‘ यु टर्न ’ घेणारी असल्याने या निवडणुकांकडे कार्यकर्त्यांनी गंभीरपणे पाहण्याची गरज असल्याचे अमित शहा म्हणाले. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर पडेल, त्यामुळे आता मतभेत विसरून आणि न रुसता कामाला लागण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

हा पक्ष घेणाऱ्यांचा आहे

निवडणुकीपूर्वी करायच्या कामांमध्ये उद्धव ठाकरे गटातून तसेच शरद पवार यांच्या पक्षात काम करणाऱ्या नाराज कार्यकर्त्यांना जोडून घ्या, असा सल्ला अमित शहा यांनी दिला. बाहेरुन पक्षात घेतल्यामुळे भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे ना ? या शहा यांच्या प्रश्नावर सर्वांनी हो असे उत्तर दिले. त्यावर शहा यांनी नवा प्रश्न विचारला या सभागृहात १५ वर्षापेक्षा किती कार्यकर्ते काम करत आहेत, त्यांनी हात वर करावे. अनेकांनी हात वर केले. आता यातील अनेकांना गेल्या १५ वर्षात काही दिले नाही. ज्यांना १५ वर्षे काम केले त्यांना काही मिळाले नाही तर काल आलेल्या कार्यकर्त्यांना किती दिले जाईल. तुम्ही काळजी करू नका, असे ते हसत म्हणाले. तेव्हा सभागृहातील काही जण व्यासपीठावर बसलेल्या अशोक चव्हाण यांच्याकडे आवर्जून बोट दाखवत होते.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah claim regarding agitations and prices of agricultural commodities amy