छत्रपती संभाजीनगर – झुडपामागे दबा धरलेल्या बिबट्याने झडप मारल्याने त्याच्याशी एका वृद्ध महिलेने निकराची झुंज दिली. पण शेवटी बिबट्याच्या हल्ल्यात ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना वैजापूर तालुक्यातील जिरी गावात मंगळवारी पहाटे उघडकीस आली. बिबट्याच्या हल्ल्यात माणूस बळी गेल्याची दोन दिवसातील दुसरी तर, १५ जानेवारीनंतरची ही तिसरी घटना आहे.

दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील वळण येथे शेतवस्तीवर घरासमोर खेळत असलेल्या ऋतुजा कर्डक या तीन वर्षाच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी पहाटे याच परिसरात असणाऱ्या जिरी गावातीस झुंबरबाई माणिक मांदाळे (वय ६५) यांचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. या माहितीला वैजापूरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रीया भिसे यांनी दुजोरा दिला असून, एके ठिकाणी झाडावर चढून बसलेल्या नरभक्षक बिबट्याला पकडण्याचे काम रात्री ८ च्या दरम्यान सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

झुंबरबाई या सकाळी उठून घराबाहेर आल्या. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. जवळपास दहा मिनिट बिबट्या व या महिलेची झुंज सुरू होती. या झटापटीत बिबट्याने या महिलेला जवळपास १०० मीटर अंतरावर फरपटत नेले. अखेर या हल्ल्यात झुंबरबाईंचा जागेवरच मृत्यू झाला.

या परिसरात मानवावर बिबट्याने हल्‍ला केल्‍याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता पर्यंत बिबट्याने तीन बळी घेतले आहेत. १५ जानेवारी रोजी आईसोबत शेतात गेलेल्या महेश सिद्धार्थ आखाडे या सहा वर्षाचा मुलाचाही मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला होता. तर तलवाडा येथील श्रुती नामदेव आयनर ही सहा वर्षांची मुलगी डिसेंबर महिन्यात बिबट्याच्या हल्यात जखमी झाली होती. याशिवाय अनेक ठिकाणी जनावरांवरही हल्ला झालेला आहे.

वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरातील गावकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जोपर्यंत बिबट्या जेरबंद होत नाही तोपर्यंत या महिलेवर अंतिम संस्कार करणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतला होता. मात्र, नंतर ग्रामस्थांची समजूत घातली. शिवूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर दुपारी महिलेवर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.