मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे या वर्षांपासून सुरू झालेल्या भगवंत देशमुख वाङ्मय पुरस्कारासाठी हंस, मोहिनी व नवल या तीन मासिकांचे/नियतकालिकांचे संपादक व ललित लेखक आनंद अंतरकर यांच्या ‘घूमर’ या पुस्तकाची निवड करण्यात आली.
रोख ११ हजार रुपये, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखालील डॉ. विलास खोले व डॉ. मनोहर जाधव या त्रिसदस्यीय समितीने अंतरकर यांची या पुरस्कारासाठी निवड केली. मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
मराठवाडा साहित्य परिषदेचे भूतपूर्व अध्यक्ष, मराठी भाषा व वाङ्मयाचे नामवंत प्राध्यापक, शैलीदार ललित गद्यलेखक, प्राचीन मराठी वाङ्मयाचे संशोधक आणि आधुनिक व मध्ययुगीन साहित्याचे मर्मज्ञ समीक्षक प्रा. भगवंत देशमुख यांच्या नावाने हा विशेष वाङ्मय पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. ललित गद्यलेखन किंवा मध्ययुगीन वाङ्मयाची समीक्षा वा संशोधनास हा पुरस्कार देण्यात यावा, अशी मसापची भूमिका आहे. या पुरस्कारासाठी मागील तीन वर्षांत प्रसिद्ध पुस्तकांचा/ग्रंथांचा विचार करण्यात येईल, असे परिषदेने म्हटले आहे.
अंतरकर यांनी गेल्या २० वर्षांत दुर्मिळ होत चाललेले ललित गद्यलेखन, कथालेखन आणि इंग्रजी कथांच्या अनुवादाचे काम केले आहे. त्यांची ‘झुंजुखेळ’, ‘रत्नकीळ’ आणि ‘घूमर’ अशी ललित गद्याची तीन पुस्तके प्रकाशित असून, त्यांच्या ‘झुंजुखेळ’ला राज्य सरकारचा, तर ‘रत्नकीळ’ला मृण्मयी पुरस्कार मिळाला. मसापने त्यांच्या ‘घूमर’ या तिसऱ्या पुस्तकाची निवड पहिल्या भगवंत देशमुख वाङ्मय पुरस्कारासाठी केली. येत्या ३१ मार्चला माजी न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Story img Loader