डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५४मध्ये राजकीय आरक्षण काढून टाका, असे म्हटले होते. आम्हीही त्याच मताचे आहोत. आरक्षित मतदारसंघातून निवडून येणारे नेते हे समाजाचे कधीही नेते नव्हते, असे रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी येथे पत्रकार बैठकीत सांगितले. रामदास आठवले हे कधीही समाजाचे नेते नव्हते, हे सांगायलाही आनंदराज आंबेडकर विसरले नाहीत.
आंदोलनापुरते रिपब्लिकन सेना डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत आहे. प्रकाश आंबेडकर हे आक्रमक नेते नाहीत. तुलनेने रिपब्लिकन सेनेने केलेली आंदोलने आक्रमक आहेत. त्यामुळे तरुण वर्ग पक्षात अधिक असल्याचा दावा त्यांनी केला. निवडणुकीच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत युती व्हावी, अशी इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगत उत्तर प्रदेशात ‘भीमराव रामजी आंबेडकर’ असे नाव लिहिण्यामागे राम मंदिराचा मुद्दा पुढे करण्याची रणनीती असल्याचा आरोप त्यांनी केला.
या प्रदेशात वडिलांचे नाव सहसा लिहिले जात नाही. ‘योगी आदित्यनाथ’, ‘केशव मौर्य’, ‘अखिलेश यादव’ अशी नावं लिहिण्याची पद्धत आहे. तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडिलांच्या नावासह पूर्ण नाव लिहावे, असा अट्टाहास धरणे हा राजकारणाचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.
कर्नाटक निवडणुका लढवू
रिपब्लिकन सेना हा पक्ष ९९ टक्के समाजकारण १ टक्का राजकारण या पद्धतीने काम करत आहे. मात्र, कर्नाटक राज्यात निवडणुका लढवू, असा दावाही आनंदराज आंबेडकर यांनी केला. या वेळी रिपब्लिकन सेनेचे संजीव बावधनकर उपस्थित होते.