‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’, स्पर्धकांचे आशय, संदर्भासहित सादरीकरण

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’च्या मंगळवारी झालेल्या औरंगाबाद विभागीय अंतिम फेरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा विद्यार्थी अनिकेत म्हस्के याने बाजी मारत मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत धडक मारली. स्पर्धेत उपस्थित आठ स्पर्धकांनी त्यांना दिलेल्या चारपैकी एका विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी, संयतपणा व आशय आणि संदर्भासहित सादरीकरण करून आपल्यातील वक्तेपणाचा आविष्कार घडवला. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासह दोन जणांची उत्तेजनार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालय परिसरातील ‘देवगिरी इन्स्टिटय़ूट अ‍ॅण्ड मॅनेजमेंट स्टडीज’ या इमारतीतील सी.व्ही. रमन सभागृहात सकाळी ११ वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. परीक्षक म्हणून प्रख्यात कवी, गीतकार प्रा. दासू वैद्य आणि प्रा. श्रीधर नांदेडकर यांनी काम पाहिले. व्यासपीठावर लोकसत्ताच्या वितरण विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक मंगेश ठाकूर, औरंगाबाद आवृत्तीच्या वितरण विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक वंदन चंद्रात्रे यांची उपस्थिती होती.

स्पर्धेसाठी मराठवाडा-कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या उदगीरसारख्या शहरातूनही स्पर्धक येथे आज आलेले होते. स्पर्धेतील तरुणांचे विचार, मते ऐकण्यासाठी जालना येथून खास निवृत्त अभियंता कुलकर्णी हेही उपस्थित होते. विभागीय अंतिम फेरीसाठी ‘लक्ष्यभेदी नवा पर्याय?’, ‘गल्लीबॉयचे भवितव्य’, ‘खेळातील परके शेजारी आणि पुढारलेल्यांचे आरक्षण’ हे चार विषय देण्यात आले होते. या चारही विषयांवरील अभ्यासपूर्ण आणि संदर्भ, ऐतिहासिक दाखले, भविष्याचा वेध घेणारे अंदाज मांडत स्पर्धकांनी कधी संयतपणे तर कधी प्रभावीपणे आपली मते मांडली.

प्रथम आलेला अनिकेत म्हस्के याला चषक व पाच हजार रुपयांचा धनादेश तर द्वितीय व तृतीय आलेल्या स्पर्धकांना अनुक्रमे तीन व दोन हजार रुपयांच्या रकमेचा धनादेश परीक्षक व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दोन स्पर्धकांना उत्तेजनार्थ सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र व प्रत्येकी हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.

संयतपणा हीच वक्त्याची ललाटरेखा- प्रा. दासू वैद्य

लोकसत्ताने विचार करण्याची ठिणगी जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. मराठी रंगभूमीच्या वाटचालीत किंवा उत्थानासाठी लोकसत्ताकडून लोकांकिका स्पर्धा घेतली जाते. वक्त दशसहस्रेषुमध्येही अत्यंत दर्जेदार विषय दिला जातो. स्पर्धकही दर्जेदार मिळत आहेत हेही महत्त्वाचे आहे. जी माणसे विचार करतात, वाचतात ती जिवंत असतात. जिवंत माणसे भोवतालातून, जगण्यातून मार्गदर्शन घेत असतात. वक्तृत्वशैलीत प्रभाव निर्माण करण्यापेक्षा परिणामकारकता किती, हे महत्त्वाचे मानले जाते. वक्ता हा समाजाचा संदर्भलेख बनत असतो. आपण जे विधान करीत असतो त्याचा अभ्यास केलाय का, याचा विचार करूनच मत मांडायला हवे. वक्त्यांनी भावनिक होता कामा नये. वक्त्यातील संयतपणा हीच त्याची ललाटरेखा असते, असे प्रतिपादन प्रख्यात कवी, स्पर्धेचे परीक्षक प्रा. दासू वैद्य यांनी मार्गदर्शन करताना केले.

‘पीतांबरी कंठवटी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धे’चे असोसिएट पार्टनर श्री धूतपापेश्वर व पुनित बालन एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड आहेत. या स्पर्धेचे पावर्ड बाय पार्टनर वास्तु रविराज, आयटीएम ग्रुप ऑफ इन्टिटय़ूशन्स, इंडियन ऑईल कॉपरेरेशन लिमिटेड आणि जनसेवा सहकारी बँक आहेत. ‘पीतांबरी कंठवटी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धे’चे असोसिएट पार्टनर श्री धूतपापेश्वर व पुनित बालन एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड आहेत. या स्पर्धेचे पावर्ड बाय पार्टनर वास्तु रविराज, आयटीएम ग्रुप ऑफ इन्टिटय़ूशन्स, इंडियन ऑईल कॉपरेरेशन लिमिटेड आणि जनसेवा सहकारी बँक आहेत.

निवडलेले स्पर्धक

* प्रथम – अनिकेत म्हस्के (डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पत्रकारिता विभाग)

* द्वितीय -आकांक्षा चिंचोलकर (विजेन्द्र काबरा महाविद्यालय)

* तृतीय -आदित्य उदावंत (देवगिरी कला व वाणिज्य महाविद्यालय)

* उत्तेजनार्थ- विजय वाकळे (माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय)

* तेजस्विनी केंद्रे (शिवछत्रपती महाविद्यालय)

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aniket mhaske from aurangabad division in the final round