छत्रपती संभाजीनगर : राज्यातील अलिबाग, सातारा, सिंधुदुर्ग, नंदूरबार, परभणी व धाराशिव या जिल्ह्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, गट-अ संवर्गातून निवड झालेले जवळपास ४८ उमेदवार डिसेंबरपासून नियुक्ती मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या उमेदवारांचे शिफारसपत्रही वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आले आहेत.
उपरोक्त वैद्यकीय महाविद्यालये नव्यानेच सुरू झालेली असून, वैद्यकीय शिक्षणातील अध्यापक आणि रुग्णालयातही रुग्ण तपासणीसाठीच्या अनुभवी डाॅक्टरांचे बळ तोकडे पडत असल्याचे चित्र आहे. परभणी, धाराशिवमध्ये तर अत्यंत कमी मनुष्यबळावर वैद्यकीय महाविद्यालयांचे कामकाज सुरू असल्याचे सांगितले जात आहे. एमपीएससीकडून शिफारस होऊनही नियुक्त्या रखडण्यामागचा ‘अर्थ’ काय असेल, असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे.
नव्याने स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शरीररचनाशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र, सुक्ष्मीजावशास्त्र, औषधशास्त्र, जीवरसायनशास्त्र, औषधवैद्यकशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र, मनोविकृतीशास्त्र, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, किरणोपचारशास्त्र, कान, नाक व घसाशास्त्र अशा अनेक विषयांमधील ‘सहयोगी प्राध्यापक व वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ’ ची १४० पदे व प्राध्यापक, गट-अ संवर्गातील ७१ पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून डिसेंबर २०२३ मध्ये जाहिरात देण्यात आली होती.
२७ आणि २८ नोव्हेंबर २०२४ मध्ये मुलाखती पार पडल्या. तर १० डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाला. २३ डिसेंबर रोजी उमेदवारांना शिफारसपत्रही प्राप्त झाले आहे. मात्र, अनेकांना अद्याप नियुक्त्या मिळालेल्या नाहीत.
शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी मान्यता आवश्यक आहे. पदांच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आलेली आहेत. मान्यतेनंतर नियुक्ती मिळेल. -शंकर जाधव, उपसचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग