लोकसत्ता प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : परळीत अजित पवार व शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांमधील वाद विकोपाला गेला असून यामध्ये एका सरपंचाचा बळी गेला आहे. शनिवारी रात्री मरळवाडीचे सरपंच बापूराव बाबूराव आंधळे यांचा डोक्यात गोळी झाडून खून झाला असून याप्रकरणी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत उर्फ बबन गित्ते यांच्यासह पाच जणांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात रविवारी खुनासह प्राणघातक हल्ला आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पाचही जणांना अटक करावी या मागणीसाठी अजित पवार गटाचे स्थानिक नेते वाल्मीक कराड यांच्यासह मोठ्या समुदायाने पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. त्यामुळे परळीतील राजकारण ढवळून निघाले असून स्थानिक पातळीवर काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

आणखी वाचा-शिवसेना बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची हकालपट्टी; अटकेनंतर पक्षाची कारवाई

याप्रकरणी ग्यानबा उर्फ गोट्या मारोती गित्ते यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून बबन गित्ते, मुकुंद ज्ञानेश्वर गित्ते (रा. वाघबेट), महादेव उद्धव गित्ते (रा. बँक कॉलनी), राजाभाऊ संजीवन नेहरकर (रा. पांगरी) व राजेश अशोक वाघमोडे (पिंपळगाव गाडे), यांच्याविरुद्ध खून, प्राणघातक हल्ला, घातक शस्त्राचा वापर आदी कलमान्वये रविवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्यानबा गित्ते व मृत सरपंच बापूराव आंधळे हे दोघे महादेव गित्तेंच्या बँक कॉलनीतील घरी गेले होते. तेथे बबन गित्ते यांनी शिवीगाळ करत पैशांची मागणी केली, शिवी देऊ नका म्हणताच बबन गित्ते यांनी पिस्तुलाने बापूराव आंधळेंच्या डोक्यात गोळी झाडली. तर महादेव गित्ते यांनी कोयत्याने पुन्हा डोक्यात वार करून ठार केले. आपल्यावरही प्राणघातक हल्ला केला, असे ग्यानबा गित्ते यांनी तक्रारीत म्हटले. या प्रकारावरून परळीत रात्रीपासूनच तणाव आहे.

आणखी वाचा-समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू; चार गंभीर

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर बबन गित्ते यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत शरद पवार यांची भेट घेतली होती. त्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. तेव्हापासूनच बबन गित्ते व अजित गटाचे नेते तथा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकांमध्ये धुसफूस सुरू झाली. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानही बबन गित्ते व मुंडे समर्थकांमध्ये वाद झाल्याच्या चर्चाही सुरू होत्या. यातच शनिवारी सरपंच बापूराव आंधळे यांचा खून झाला आणि तो बबन गित्ते यांनीच केल्याची तक्रारच नोंद झाल्याने स्थानिक राजकारण ढवळून निघाले.