छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातल्या माळेगाव पिंप्री येथील रवींद्र भागवत पाटील हा ३२ वर्षीय जवान (६४९८१६७-W) जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्यावर असतानापासून बेपत्ता झाला आहे. त्याला १३ वर्षे झाली असून त्याचा शोध घेण्यासाठी सैन्य दलाचे आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या दालनाचे उंबरठे झिजवून उपयोग होत नसल्याचा आरोप करत जवान रवींद्र पाटील यांचे आई-वडील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत जवान रवींद्र यांचे मोठे बंधू संतोष व नातेवाईक असलेले सैनिक चंदू चव्हाणही आहेत.
चंदू चव्हाण हे काही वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानात गेल्यामुळे देशभर चर्चेत आले होते. जवान रवींद्र पाटील यांचे वडील भागवत पाटील यांनी तर मुलाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. आई बेबाबाई यांनी आम्हाला जगण्याचा कुठलाही आधार नसून चार एकरपैकी दोन एकर जमीन मोठ्या मुलाला वाटणीत गेली तर दोन एकर जमीन रवींद्र यांची सैन्यात जाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी खर्चासाठी विकल्याचे सांगितले. भागवत पाटील म्हणाले, “मुलाच्या शोधासाठी बिहार, जम्मू काश्मीरपर्यंत अनेकवेळा हेलपाटे मारले. स्थानिक प्रशासन, पोलीस ठाणे, जिल्हा सैनिक अधिकारी कार्यालयाशीही संपर्क केला, निवेदने दिली. पण उपयोग झाला नाही.