आयसिसशी संबंधित इम्रान मुअज्जम या युवकास शनिवारी वैजापूर शहरातील बर्डी मशीद भागात राष्ट्रीय तपास पथक (एनआयए) व दहशतवादविरोधी पथकाने छापा टाकून अटक केली. सकाळी दहाच्या सुमारास २० ते २५ जणांच्या पथकाने ही कारवाई केली. इम्रान यास वैजापूर न्यायालयात हजर करून एनआयएच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपासासाठी त्याला दिल्ली येथे नेण्यात येण्याची शक्यता आहे. दोन तासांहून अधिक चाललेल्या कारवाईत संगणक, लॅपटॉप, घरातील सर्व सदस्यांचे भ्रमणध्वनी जप्त केल्याचे समजते.
बर्डी मशीद भागात इम्रान मुअज्जम हा त्याची आई व दोन भावांसह राहतो. तो संगणक दुरुस्तीची कामे करीत असे. रात्री उशिरापर्यंत संगणकावर असल्याने दिवसा झोप आणि रात्री काम असा त्याचा दिनक्रम असे. त्याचा एक भाऊ उर्दू शाळेत शिक्षक, तर दुसरा भाऊ पाटबंधारे विभागात शिपाई म्हणून कार्यरत आहे. शनिवारी सकाळी एटीएस व एनआयएच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमुळे वैजापूर शहरात खळबळ उडाली.
कारवाईत एनआयएच्या वतीने दहशतवादविरोधी पथकाची मदत घेण्यात आली. मुअज्जमच्या घरावर छापा टाकल्यानंतर दोन तासांहून अधिक काळ झडती सुरू होती. छाप्यात तपास यंत्रणांच्या हाती काय लागले, हे समजू शकले नाही. वैजापूर न्यायालयाच्या परवानगीने आरोपीस एनआयएच्या ताब्यात देण्यात आले. इम्रान हा बारावीपर्यंत शिकला होता. घरातील दोन्ही संगणकावर तो काम करीत असे. रात्री उशिरापर्यंत तो नक्की काय काम करीत होता, याची माहिती आम्हाला नव्हती, असे इम्रानच्या भावाने सांगितले. इम्रानच्या झडतीत वेगवेगळी सीमकार्ड आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Story img Loader