वरच्या धरणांमधून सोडलेल्या पाण्याचा कमाल प्रवाह जेमतेम दोन दिवसच टिकला. आता मात्र हा प्रवाह खूपच कमी होत आहे. नवीन पाणी येण्याचे प्रमाण बरेच कमी झाल्याने शुक्रवारी सकाळी जायकवाडी जलाशयातील नवीन साठा चार टीएमसीच्या पुढे पोहोचला. जायकवाडीतील पाणीसाठा आता ९.१६ टक्के झाला असून, पाणी दाखल होण्यापूर्वी जलाशयात ४.३३ टक्के पाणीसाठा होता.
मुळा, दारणा, गंगापूर आदी धरणांतून पाणी सोडणे आता बंद केले असून, केवळ निळवंडे धरणातून सध्या पाणी सोडले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वरच्या धरण समूहांतून जायकवाडीत १२.८४ टीएमसी पाणी सोडणे अपेक्षित असले, तरी प्रवरा समूहातील प्रामुख्याने भंडारदरा धरणातून नियोजित पाणी सोडण्यात तांत्रिक अडचण उद्भवल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात येते.
प्रवरा समूहातून ६.५ दशलक्ष घनफूट पाणी सोडणे अपेक्षित असले, तरी यातील निळवंडे धरणातून १.७५ दलघफू पाणी सोडण्यात आले आहे. मुळा धरणातून १.७४ दलघफू पाणी सोडले असले, तरी या धरणाच्या दोन्ही कालव्यांतून जायकवाडीकडे पाणी वाहात आहे. मुळा उजव्या कालव्यातून १३३, तर डाव्या कालव्यातून १०० क्युसेकने पाणी सध्या वाहात आहे. जायकवाडीपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावरील भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात स्पील वेच्या खाली गेलेली पाणीपातळी हाच मोठा अडथळा ठरला आहे. याला पर्याय म्हणून भंडारदराच्या जलविद्युत केंद्रातून पाणी सोडून निळवंडे धरणात जमा करायचे व तेथून ओझर बंधाऱ्यात पाणी आणून प्रवरा नदीपात्रात सोडण्याचे नियोजन आहे. निळवंडय़ातून ओझर बंधाऱ्यापर्यंत दोन हजार क्युसेकने पाण्याचा प्रवाह सुरू असला, तरी ओझर बंधाऱ्यापासून मात्र प्रत्यक्षात १ हजार ८०९ क्युसेकने पाणी सोडले जात आहे. नेवाशातील मध्यमेश्वर बंधाऱ्यातून १ हजार ७०५ क्युसेकने पाणी जायकवाडीकडे वाहात आहे.
वरच्या धरणांतून सोडलेल्या १२.८४ दलघफू पाण्यापैकी जायकवाडी जलाशयात सुरुवातीला किमान ६-७ दलघफू पाणी पोहोचणे अपेक्षित होते. दि. १ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात आले असले, तरी शुक्रवारी सकाळी आठपर्यंत जेमतेम ४ दलघफू पाणी जायकवाडीत दाखल झाले होते. आतापर्यंत किमान ५० टक्के पाणी मध्येच झिरपले. सोडलेल्या पाण्यापैकी निम्मेच पाणी कसेबसे जायकवाडीत पोहोचले. सध्या दिवसाला ३-४ दलघमी पाणी जायकवाडीत जमा होत आहे. जलाशयात दोन हजार क्युसेकने नवीन पाणी येत आहे. वरच्या धरणांतून एकदम पाणी सोडले त्या वेळी मधले जेमतेम दोन दिवस जलाशयात झेपावणाऱ्या पाण्याचा प्रवाह महत्तम म्हणजे ९ हजार क्युसेकपर्यंत वाढला होता. सध्या नव्याने दाखल होणाऱ्या पाण्याचा वेग आणि गळती पाहता जलाशयात आणखी केवळ एक दलघफू पाणी येऊ शकते किंबहुना केवळ ५ दलघफू पाणीच जलाशयात येईल. सोडलेल्या १२.८४ दलघफू पाण्याच्या तुलनेत हे दाखल झालेले-होणारे पाणी तब्बल ७-८ दलघफूने कमी असेल!
भंडारदरा धरणाची निर्मिती ब्रिटिशांच्या काळात १९१०मध्ये झाली. या धरणाची पाणी सोडण्याची यंत्रणा बरीच जुनाट झाली असून, जुना दरवाजा हाच पाणी सोडण्यातील प्रमुख अडथळा ठरला आहे. धरणाच्या स्पील वेच्याही खाली सध्या पाणी गेले आहे. त्यामुळे हे पाणी सध्या तरी लगेच सोडता येत नाही. याला पर्याय म्हणून जलविद्युत केंद्रातून ८८९ क्युसेकने पाणी सोडले जात आहे. परंतु हे पाणी निळवंडे धरणात आले, तरी तेथून २ हजार क्युसेक क्षमतेने प्रवरापात्रात सोडणे सुरू आहे.
सोमवारी बैठक शक्य
दरम्यान, जायकवाडीत दाखल झालेल्या पाण्याच्या विनियोगाबाबत लवकरच कालवा सल्लागार समितीची बैठक होणे अपेक्षित आहे. येत्या सोमवारी (दि. १६) ही बैठक होण्याची शक्यता आहे. या बरोबरच माजलगाव धरणात जायकवाडीतून किती पाणी देणार तेही अजून ठरले नसल्याचे सांगण्यात येते.
जायकवाडीत जेमतेम ५ टीएमसी पोहोचणे शक्य!
वरच्या धरणांमधून सोडलेल्या पाण्याचा कमाल प्रवाह जेमतेम दोन दिवसच टिकला. आता मात्र हा प्रवाह खूपच कमी होत आहे.
Written by बबन मिंडे
First published on: 14-11-2015 at 01:20 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrive five tmc water in jayakwadi is impossible