लोकसत्ता प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : आंतरजातीय प्रेमविवाह केले त्याला २५ वर्षे होत असतानाच प्रशासकीय सेवेतील एका उपजिल्हाधिकाऱ्याने आपलीच पत्नी, तिचा मित्र, मेहुणा, सासूसह सहा जणांविरूध्द जातिवाचक वागणूक, शिवीगाळ व जादूटोण्यातील अघोरी कृत्य करत विषप्रयोग केल्याचा आरोप करणारी तक्रार सातारा पोलीस ठाण्यात शनिवारी दाखल केली. या प्रकरणी ॲट्रॉसिटी व जादूटोणा कायद्यान्वये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी पत्नी, मेहुणा, पत्नीचा मित्र यांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार हे छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी आहेत. तक्रारीनुसार जो काही घडलेला प्रकार तो २०२१ ते ३० मार्च २०२५ दरम्यान जालाननगर येथे घडला.
पोलिसांनी सारिका देवेंद्र कटके, विनोद कैलास उबाळे (३८, रा. बोरखेडी जि. जालना) आणि अतिश देशमुख (४२, रा. उस्मानाबाद) या तिघांना अटक केली आहे. प्रकरणात देवेंद्र तुकाराम कटके (५०, रा. जालननगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानूसार, कटके यांनी २००० साली सारिका यांच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. सारिका या खुल्या प्रवर्गातील आहेत तर कटके अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत. प्रारंभी काही वर्षे दोघांचे वैवाहिक जीवन सुरळीत होते, मात्र कालांतराने त्यांच्या पत्नीचे वर्तन संशयास्पद बनले. पत्नीच्या वर्तनावर लक्ष ठेवले असता, तिचे दोन-तीन जणांशी संबंध असल्याचा आरोप कटके यांनी केला. या संदर्भाने पत्नीला समजावून सांगण्याचा वारंवार प्रयत्न केला, मात्र तिने वारंवार जातीवाचक शिवीगाळ करुन अपमान केला, असा आरोप केला.
रंगेहाथ पकडले, पिस्तूल दाखवत धमकी
तक्रारीनुसार, सारिका ही पतीच्या नावे असलेल्या स्कोडा वाहनाने घरी जाण्याएवेजी दुसऱ्याच मार्गावर असल्याचे जीपीएसमुळे कटके यांच्या निर्दशनास आले. त्यानुसारच कटके यांनी जीपीएस आधारे केंम्ब्रीज चौकात पत्नी व तिचा मित्र विनोद यांना पकडले. विनोद उबाळे याने कटके यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली असून घरात जादूटोण्याचे साहित्य सापडल्याचाही आरोप तक्रारीत केला आहे. पुढील तपास सहाय्यक आयुक्त डॉ. रणजीत पाटील हे करत आहेत.