सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या नागार्जुननगरमधील शासकीय मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहात काही समाजकंटकांनी रविवारी रात्री सशस्त्र हल्ला केला. या प्रकारास २४ तास उलटले, तरी आरोपी मात्र पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
नांदेड-िहगोली मार्गावरील महाराणा प्रताप चौकात हे वसतिगृह चालवले जाते. वसतिगृहातील विद्यार्थी व भोजनालय चालक यांच्यात वाद सुरू आहे. शासन निर्देशानुसार एका विद्यार्थ्यांवर दरमहा साडेचार हजार रुपये खर्च होतात. पण भोजनालय चालवणारा निकृष्ट अन्नपुरवठा करून नियमांची पायमल्ली करतो, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित यंत्रणेकडे केल्या, परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. मराठवाडय़ातील बहुतांश वसतिगृहांचा स्वयंपाकाचा ठेका धुळे येथील संजय धुळेवाले यांच्याकडे आहे. त्यांनी त्या-त्या ठिकाणी स्थानिक व्यक्तींना उपकंत्राट दिले आहे. नांदेडच्या वसतिगृहाचे उपकंत्राट प्रशांत इंगोले यांच्याकडे आहे. जेवणाबाबत तुम्ही तक्रारी करता का, अशी विचारणा करीत प्रशांत इंगोलेचे काही समर्थक खंजर, चाकू घेऊन रविवारी रात्री वसतिगृहात घुसले. साडेनऊ वाजता वसतिगृहात आल्यानंतर त्यांनी टी.व्ही. संच फोडला, खुच्र्या तोडल्या व दिसेल त्याला मारहाण सुरू केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने विद्यार्थी आरडाओरड करीत वसतिगृहाबाहेर पळाले. वसतिगृहालगत नगरसेवक विनय गुर्रम यांचे निवासस्थान आहे. भयभीत झालेले काही विद्यार्थी गुर्रम यांच्याकडे धावले. त्यानंतर गुर्रम व काही शिवसनिक वसतिगृहात धावले. ज्या विद्यार्थ्यांना चोप मिळाला होता ते तेथे विव्हळत पडले होते.
स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विनय गुर्रम यांनी विमानतळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी विद्यार्थ्यांचे जाबजबाब नोंदवले. विशेष म्हणजे शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान झालेले असताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे सौजन्यही दाखवले नाही.
वसतिगृहात सोयीसुविधांचा अभाव आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, परंतु हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी संगणकातील हार्डडिस्क काढून घेतल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. जेवण निकृष्ट दर्जाचे आहे. पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही, स्वच्छतेचे कंत्राट दिलेल्या बीव्हीजी कंपनीचे कर्मचारी इकडे कधी फिरकतच नाहीत, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. एवढा थरार घडूनही सोमवारी दिवसभर सामाजिक न्याय विभागाचा एकही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी धावला नाही. नगरसेवक गुर्रम यांनी सामाजिक न्यायमंत्री, शिक्षणमंत्री व विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करा अन्यथा विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये राहण्यास भाग पाडेन, असा इशारा दिला.

Story img Loader