साईबाबा संस्थान विश्वस्तप्रकरणात खंडपीठाचा इशारा

औरंगाबाद : पोलिसांनी शपथपत्र दाखल न केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अहमदनगरचे पोलीस अधीक्षक इशू सिंधु यांना १८ एप्रिल रोजी सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले. हजर न राहिल्यास आणि शपथपत्र दाखल न केल्यास पोलीस अधीक्षकांना आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी अटक वॉरंट बजावण्यात येईल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाविरोधात निकाल लागल्यानंतर घरावर मोर्चा काढण्यात आल्याचे, तसेच पोलीस संरक्षण काढल्यासंदर्भात दाखल याचिकेतील सुनावणीदरम्यान न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. मंगेश एस. पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना इशारा दिला आहे.

कोपरगाव येथील सामाजिक कार्यकत्रे संजय काळे यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. प्रकरण साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांच्या नियुक्तीबाबत पुनर्वचिार करण्याबाबतचे आहे. याचिकेनुसार साईबाबा संस्थान विश्वस्तांच्या नियुक्तीबाबत पुनर्वचिार करावा, असा निकाल ९ ऑक्टोबर २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १० ऑक्टोबर २०१८ रोजी काही जणांचा जमाव मोर्चा घेऊन याचिकाकर्त्यांच्या घराच्या दिशेने येत होता. कोपरगाव पोलिसांनी जमावाला वाटेत अडवले. मात्र हा जमाव हल्ला करणार होता, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली नाही, अशी तक्रार याचिकाकत्रे काळे यांनी राज्य शासनाकडे केली होती. मात्र योग्य दखल न घेतल्याने आणि मोच्रेकऱ्यांवर कारवाई न  केल्याने त्यांनी याचिका दाखल केली होती.  खंडपीठाने संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी मोर्चास परवानगी दिली का, मोर्चा घेऊन येणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई का केली नाही, अशी विचारणा करत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर, अ‍ॅड. अजिंक्य काळे यांनी याचिकाकर्त्यांतर्फे काम पाहिले.