औरंगाबाद महापालिकेच्या उपमहापौरांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या अस्थिकलशासोबत सेल्फी घेतली आहे. ही दृश्यं व्हायरल झाल्यानंतर उपमहापौर विजय औताडे यांच्यावर चहूबाजूंनी टीका होतेय. सेल्फी कुठे घ्यायचा आणि कुठे नाही, याचं तारतम्य सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या लोकांनी ठेवायला हवं, अशाही प्रतिक्रिया औरंगाबादकरांनी दिल्या आहेत. विशेष म्हणजे वाजपेयींच्या शोकप्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना मारहाण करण्यात औताडे यांचा सहभाग होता.

वाजपेयी यांच्या अस्थी असलेल्या वाहनांमध्ये उपमहापौर विजय औताडे स्वता: सेल्फी काढण्यात गुंग झाले होते. सेल्फी काढण्याबरोबरच ते इतरांचेही फोटो काढण्यात मग्न दिसतेय. त्यांची ही सेल्फीक्रेज त्यांना चांगलीच महागात पडली आहे. त्यांच्यावर चहूबाजूने टीका होत आहे. भाजपाने अशा नेत्यांना पक्षातून काढून टाकले पाहिजे संतप्त प्रतीक्रिया ट्विट करत इमतायज जलील यांनी दिली आहे.

 

गुरुवारी भाजपाच्या उस्मानपुरा  कार्यालयात वाजपेयी यांच्या अस्थींच्या दर्शनासाठी कलश आणण्यात आला होता. कार्यालयात कलशदर्शनासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी ११ वाजेनंतर अस्थिकलश रथ जालन्याकडे रवाना झाला. सेव्हन हिल येथून रथ जात असताना रथावर उपमहापौर औताडे सेल्फींचे सेलिब्रेशन करीत होते.  सेल्फी काढण्याचा हा प्रकार भाजप श्रेष्ठी खपवून घेणार काय? असा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे.