विष घेतल्याची शवविच्छेदनातील प्राथमिक माहिती

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३० वर्षांपासून अध्यक्ष असलेले काँग्रेस नेते सुरेश दयाराम पाटील यांनी सोमवारी दुपारी विष प्राशन करून आत्महत्या केली. मृत्युपूर्वी सुरेश पाटील यांनी एक चिठ्ठीही लिहून ठेवली असल्याची माहिती असून त्यामध्ये आत्महत्येचे कारण आणि ज्यांच्यामुळे ते तणावाखाली होते, त्यांची नावे असल्याचे समजते. पाटील यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी त्यांचे मूळ गाव असलेल्या कन्नड तालुक्यातील नागद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी शकुंतला, माजी आमदार नितीन पाटील, पुण्यातील उद्योजक सचिन पाटील, विवाहिता मुलगी डॉ. संगीता, जावई डॉ. विनोद सिसोदे, नातू असा परिवार आहे.

सुरेश पाटील हे सोमवारी सकाळी जिल्हा बँकेच्या व्यवहारासंदर्भातील एका प्रकरणातील सुनावणीसाठी न्यायालयातही गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास ते घरी आले. घरातला त्यांचा वावर तणावाखालीच होता. जेवण करून त्यांच्या खोलीत जाऊन झोपले. अडीचच्या सुमारास ते नेहमी उठत. मात्र अडीच वाजून गेल्यानंतरही उठत नसल्यामुळे त्यांच्या खोलीचे दार ठोठावले. प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांच्या खोलीचे दार तोडण्यात आले. प्रारंभी कुटुंबीयांना पाटील यांना हृदयविकाराचा झटका आला असेल म्हणून तातडीने नजीकच्या खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र तेथे मृत्यू संशयास्पद वाटल्यामुळे खासगी दवाखान्यातील डॉक्टरांनी पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. दरम्यान, ही माहिती कळताच क्रांती चौक पोलीस ठाण्याचे अधिकारी पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचले. तेथे एक विषाची बाटली आढळली. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार पाटील यांनी बाथरूममध्ये जाऊन विष घेतले. सायंकाळी सुरेश पाटील यांच्या मृतदेहाची घाटीचे प्रभारी अधीक्षक डॉ. कैलास झिने यांच्या पथकाने उत्तरीय तपासणी केली. पाटील यांच्या मृतदेहात प्राथमिक तपासणीत विष आढळल्याची माहिती सूत्रांकडून  मिळाली. पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पाटील यांनी आत्महत्या केली की अन्य कशामुळे त्यांचा मृत्यू झाला, हे सांगता येईल.

दरम्यान जिल्हा बँकेचे अनेक संचालक, विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घाटी रुग्णालयात धाव घेऊन पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले.

बँक कर्मचारी ते अध्यक्ष

सुरेश पाटील यांच्याबाबत शून्यातून विश्व निर्माण केले, असे बोलले जाते. औरंगाबाद जिल्हा बँकेत ते कर्मचारी म्हणून लागले. कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून कालातंराने त्यांना बँकेच्या संचालक मंडळावर घेतले. त्यानंतर  आजपर्यंत पाटील हे तब्बल ३० वर्षे बँकेचे अध्यक्षपदी राहिले. त्यांनी दोन वेळा लोकसभा निवडणूकही लढवली होती. त्यांचे पुत्र नितीन पाटील हे १९९९-२००४ या काळात कन्नडचे आमदार होते.

आणखी एका तक्रारीमुळे तणावाखाली

आमच्या घरावर हल्ला झाला असून त्याला पाटील हेच जबाबदार आहेत, असा आरोप करून त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी एका गटाने पोलीस ठाणेही गाठले होते. वारंवार बँकेविरुद्ध तक्रारी दाखल करून अडचणीत आणले जात असल्यामुळेही पाटील हे तणावाखाली होते, असे निकटवर्तीयांकडून सांगितले जात असून या पाश्र्वभूमीवर घाटी रुग्णालयातही पोलिसांचा ताफा तनात होता. तर दुसऱ्या गटातील प्रमुखांना त्यांच्या घर व परिसरात स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती आहे.

Story img Loader