औरंगाबाद जिल्ह्यात करमाडजवळील गोलटगाव शिवारात झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणात पोलिसांना यश आलं आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तिघेही आरोपी लातूरच्या औसा तालुक्यातील रहिवासी आहेत. आरोपींनी हत्या केलेला तरुण चालक नागपूर येथील रहिवासी होता. आरोपींनी त्याची हत्या करून त्याच्या ताब्यातील वाहन (कॅब) पळवून नेल्याची माहितीही समोर आली आहे. पोलीस अधीक्षक निमित्त गोयल यांनी याबाबत सोमवारी (१० जानेवारी) औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी ग्रामीण पोलिसांनी २०२१ मध्ये केलेल्या कामगिरीचीही माहिती देण्यात आली.
या प्रकरणात पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं विशाल राजेंद्र मिश्रा, शिवाजी दत्तू बनसोडे आणि सुदर्शन जनकनाथ चव्हाण अशी आहेत. विशाल वासुदेव रामटेके (वय ३२, रा.नागपूर) असं हत्या झालेल्या पीडित तरुणाचे नाव आहे.
जप्त मोटारसारखेच दुसरे वाहन पळविण्याचा कट
हत्येच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार विशाल मिश्रा हा आरोपी आहे. तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून पुणे येथे ओला कंपनीत कॅब चालवायचा. मात्र त्याची कॅब नळदुर्ग पोलिसांनी लुटमारीच्या गुन्ह्यात जप्त केली. त्यामुळे शिवाजी व सुदर्शन यांना सोबत घेऊन आरोपी विशालने जप्त मोटारसारखेच दुसरे वाहन पळविण्याचा कट रचला.
हेही वाचा : परभणीत पत्नी गाढ झोपेत असतानाच गळा दाबून हत्या, नंतर पतीची गळफास घेऊन आत्महत्या
आरोपी नागपूरहून जालना येथे एका वाहनावर आले. आरोपींनी चालक विशाल रामटेके याला गोलटगावजवळ अडवून त्याची मोटार पळवण्याच्या उद्देशाने गळा आवळून खून केला. ही घटना डिसेंबर २०२१ मध्ये घडली. या खूनाच्या घटनेनंतर आरोपी पुण्यात एका भाड्याच्या खोलीत लपून बसले होते. मात्र, अखेर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.