औरंगाबादेत रिक्षाचालकाने धावत्या रिक्षात तरुणीशी अश्लिल भाषेत संभाषण करत छेड काढण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छेडछाडीच्या या प्रसंगामुळे तरुणीने धावत्या रिक्षातून उडी घेतली. या घटनेत तरुणीच्या डोक्याला दुखापत झाली असून पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकास ताब्यात घेतले आहे. सय्यद अकबर सय्यद हमीद असे आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा >>> “दरवाढीच्या वाहत्या गंगेत साठेबाज, व्यापारी, कॉर्पोरेट कंपन्या…”; महागाईवरुन शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादेतील सिल्लेखाना परिसरात एका तरुणीसोबत रिक्षाचालकाने धावत्या रिक्षात छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. तरुणी रिक्षात एकटी असल्याचे पाहून रिक्षाचालकाने तिच्याशी अश्लिल भाषेत संभाषण करायला सुरुवात केली होती. याच कारणामुळे तरुणीने घाबरून धावत्या रिक्षातून उडी घेतली. यामध्ये तिच्या डोक्याला मार लागला आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयाच उपचार सुरू आहेत. तर या घटनेची दखल घेत औरंगाबाद पोलिसांनी आरोपी रिक्षाचालक सय्यद अकबर सय्यद हमीद याला अटक केली आहे.
हेही वाचा >>> “अब तेरा क्या होगा कालिया?” भाषणातून सुषमा अंधारेंचे एकनाथ शिंदेंना खोचक चिमटे!
पोलीसांनी सीसीटीव्ही तपासून आरोपीला बेड्या ठोकल्या
या घटनेबाबतची सविस्तर माहिती येथील पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार रिक्षाचालकाच्या अश्लिल संभाषणामुळे तरुणीने सिल्लेखाना चौक परिसरात रिक्षातून उडी घेतली. यामुळे तरुणीच्या डोक्याला मार लागल्याने ती जखमी झाली आहे. या तरुणीला रिक्षाबद्दल कोणतीही माहिती नव्हती. मात्र पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी सय्यदला अटक केली. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेची पुढील चौकशी करत आहेत.