एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पांडुरंगराव गुरमे यांनी रविवारी युरोपमधील इस्टोनियाची राजधानी टॅलिनमध्ये झालेल्या ट्रायथलॉन स्पर्धातला ‘आयर्नमॅन’ हा बहुमान मिळविला.
मागील सुमारे दोन वर्षांपासून ते या स्पर्धेची तयारी करत होते. त्यांनी स्पर्धा ७ तास ४४ मिनिटे एवढ्या वेळात पूर्ण केली.
१.९ किलोमीटर समुद्रात पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर धावणे हे तीनही क्रीडाप्रकार, साधारण १७ ते १८ अंश सेल्सियस तापमानात एकसलग पूर्ण करावे लागणारी ही जगातील कठिणतम स्पर्धांपैकी एक समजली जाते. वाळूज औद्योगिक वसाहतीतील उद्योजक अभिजित नारगोलकर हे गुरमे यांचे ‘कोच’ आहेत.
लेह-लडाख खारदूगमध्ये सायकलिंग –
दर आठवड्याला ३०० किलोमीटर सायकलिंग, २१ किलोमीटर धावणे आणि ७ किलोमीटर पोहणे हा क्रम गुरमे यांनी मागील वर्षभर सांभाळला. निर्व्यसनी व शाकाहारी व्यक्तिमत्त्व असलेल्या संदीप गुरमे यांनी मनाली ४००० फूट उंची ते लेह-लडाख खारदूगमध्ये सायकलिंग केले आहे.