दुष्काळ मराठवाडय़ाच्या पाचवीलाच पुजला की काय, अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली. गेल्या वर्षी तर पाण्याशिवाय हाल झाले. लातूरला तर रेल्वेगाडीने पाणी आणावे लागेल. यंदा चांगला पाऊस होऊ दे, असे निसर्गाला साकडे घालण्यात आले होते. पाऊस असा काही बरसला की, मराठावाडय़ातील जलाशयच भरले नाहीत तर शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले. दुष्काळामुळे गेली तीन वर्षे सरकारला शेतकऱ्यांना मदत द्यावी लागली. यंदा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली जावी, अशी मागणी केली जात आहे.
तीन वर्षांच्या दुष्काळानंतर मराठवाडय़ात पाऊस धो-धो बरसला. विशेषत: दुष्काळी पट्टय़ात म्हणजे लातूर-बीड-उस्मानाबाद या जिल्ह्य़ात तर पावसाने कहरच केला. मराठवाडय़ातील ८ जिल्ह्य़ांत तब्बल १६ लाख ७४ हजार ४०२ हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अतिवृष्टी झाल्यानंतर मदत देण्याचा स्थायी आदेश दरवर्षी अमलात येत असे. मात्र या वर्षी मदतीचे अनुदान आणि पीक विमा याची सांगड घातली असल्याने अनुदान वितरणाबाबत कृषी विभागात नवे संभ्रम निर्माण झाले आहे. मराठवाडय़ात ७८.२२ टक्के शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत हप्ता भरला. ३५ लाख ६२ हजार शेतकऱ्यांनी २५२ कोटी ६२ लाख रुपये पीकविम्यापोटी भरले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना वगळून उर्वरित २२ टक्क्यांना शासन अनुदान देणार आहे. त्याचे निकष कोणते, याबाबतही संभ्रम आहे. राष्ट्रीय आपत्तीच्या नियमानुसार रक्कम दिली जाईल काय, हे अजून स्पष्ट झालेले नाही. त्याबाबतचे आदेशही निघालेले नाहीत.
नाशिकमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरीला पूर आला. त्यामुळे वैजापूर आणि गंगापूर या दोन तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये मोठे नुकसान झाले. औरंगाबाद जिल्ह्य़ातील ७७० हेक्टरावरील कापूस, मका आणि सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीत लातूर, बीड आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्य़ांत सर्वाधिक नुकसान झाले. परभणी आणि हिंगोली या जिल्ह्य़ात सोयाबीनच्या शेंगा पाण्यात कुजल्या. पावसाचे पाणी शेतात साठून राहिल्याने पिके पिवळी पडली. तीन वर्षांचा दुष्काळ तीव्र होता की, अतिवृष्टी होऊनही आणि पिकांचे नुकसान होऊनदेखील शेतकरी नाराज नाही. हे पीक गेले तरी पुन्हा एकदा उभारी घेता येईल, एवढे पाणी असल्याने रब्बी हंगामासाठी तो तयारीला लागला आहे. परभणी जिल्ह्य़ात कापसाची मुळे सडू लागली असल्याने नुकसान झाले, तर हिंगोलीची हळदीची बाजारपेठ पूर्णत: कोलमडेल की काय, एवढे नुकसान झाले आहे. हिरवी मिरची, टोमॅटो आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पीक हाती येऊनही दर घसरल्यामुळे फटका बसला आहे. एवढे दिवस कोरडय़ा दुष्काळाने मारले, आता जमिनीत निर्माण झालेल्या ओल आणि शेतात साठलेले पाणी यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत नुकसानभरपाई कशी मिळेल, याची विचारणा करणाऱ्यांना मात्र नीटशी उत्तरे मिळत नाहीत. त्याचे कारण प्रशासकीय संभ्रमात दडली आहेत.
पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले जाणार आहे. तलाठी आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी हे पंचनामे करत आहेत. अधिसूचित क्षेत्राच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्यास मदत मिळू शकते. हे नुकसान ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे की नाही, हे ठरविण्याचे अधिकार कृषी विभागाला आहेत. पंतप्रधान पीकविमा योजनेतून ७८ टक्के शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याने उर्वरित २२ टक्क्यांसाठी शासन अनुदान देणार आहे.
मराठवाडय़ात अतिवृष्टीमुळे पीकनिहाय झालेले नुकसान (हेक्टरमध्ये)
- सोयाबीन :१०९४११८
- कापूस : १४३७९५
- मका : २८२७
- बाजरी : ५०५८९
- ज्वारी : ८१०१३
- तूर : ४९७८८
तेरणाकाठी सात एकर जमीन आहे. दुष्काळामुळे गेल्या तीन वर्षांत काही पिकले नाही. या वर्षी ५ एकरावर सोयाबीन लावले. चांगला पाऊस झाला. तेव्हा वाटले होते, चांगले पीक हाती येईल. पण पाऊस पडत गेला आणि सगळे पाण्यात गेले. दोन वेळा नदीला पूर आला. पीक तर वाहूनच गेले. मातीही वाहून गेली. सोयाबीन नासले. एका एकरावर कसेबसे सोयाबीन शिल्लक होते, त्याला मोड फुटले. आता रब्बीसाठी हरभरा बियाणे घ्यायचे आहे. शासनाने लवकर मदत दिली तर बरे होईल.
– राम वामन डोंगरे, (रा. सावरी, ता. निलंगा, जि. लातूर)